चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला अद्याप सुमारे सव्वाचार वर्षांचा कालावधी असला, तरी करवीरमध्ये विधानसभेसाठी पारंपरिक विरोधकांत वार-पलटवार सुरू झाले आहेत. करवीरचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके व अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश करत असलेले त्यांचे विरोधक राहुल पाटील यांच्यात आरोप- प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला असतानाच सतेज पाटील यांनी, तर जि. प. ची लढाई मलाच लढावी लागेल या विधानाने करवीरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
करवीर मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्लाच. आताचा करवीर मतदारसंघ म्हणजे जुन्या सांगरूळ विधानसभा मतदारसंघाचा बराचसा भाग. याच मतदारसंघातून काँग्रेसच्या किल्ल्याला शिड्या लावण्याचे शिवधनुष्य सर्वात आधी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंदराव कलिकते यांनी पेलले. त्यांनी 1985 मध्ये ज्येष्ठ नेते श्रीपतराव बोंद्रे यांचा पराभव केला. पुन्हा 1990 मध्ये हा मतदारसंघ बोंद्रे यांनी मिळविला; मात्र 1995 मध्ये या मतदारसंघातून पी. एन. पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली; मात्र 1995 व 1999 या दोन्ही निवडणुकांत शेतकरी कामगार पक्षाचे संपतराव पवार-पाटील यांनी विजय मिळवत काँग्रेसला पराभवाचा तडाखा दिला.
2004 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे पी. एन. पाटील यांनी विजय मिळविला. 2009 मध्ये सांगरूळ मतदारसंघ संपुष्टात आला. त्याचा बराचसा भाग करवीर मदारसंघात होता, तर शहरातील काही प्रभाग व सांगरूळ ग्रामीणमधील काही भाग एकत्र करून कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ अस्तित्वात आणण्यात आला. 2004 मध्ये करवीर मतदारसंघातून सतेज पाटील यांनी आपल्या विजयाची मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांना पराभूत केले. 2009 मध्ये नव्याने आकाराला आलेल्या कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला, तर करवीरमधून शिवसेनेच्या तिकिटावर चंद्रदीप नरके यांनी विजय मिळविला.2014 मध्ये सतेज पाटील यांना पराभूत करून भाजपचे अमल महाडिक निवडून आले. करवीरची जागा चंद्रदीप नरके यांनी कायम राखली.
2019 मध्ये कोल्हापूर दक्षिण मधून काँग्रेसचे ऋतुराज पाटील विजय झाले, तर करवीरमधून पी. एन. पाटील यांनी विजय मिळविला. 2024 मध्ये कोल्हापूर दक्षिणची जागा भाजपचे अमल महाडिक यांनी जिंकली. पी. एन पाटील यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेसने राहुल पाटील यांना निवडणुकीत उतरविले; मात्र त्यांचा पराभव झाला व चंद्रदीप नरके यांंनी विजय मिळविला. पराभवानंतर राहुल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या; मात्र त्यांनी आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेला भोगावती कारखाना आर्थिक अडचणीत असून त्याला मदतीचे आश्वासन त्यांना मिळाल्याचे समजते.
अजित पवार राष्ट्रवादीला प्रत्येक मतदारसंघात आपली ताकद वाढवायची आहे, तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून राहुल पाटील यांना ताकद हवी आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक व गोकुळच्या संचालक मंडळात त्यांना आपल्या गटातील मंडळींना स्थान मिळवून द्यायचे आहे. या दोेन्ही संस्थांवर हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व असून मुश्रीफ यांची मदत त्यांच्या पक्षात गेल्याशिवाय होणार नाही हे सूत्र या प्रवेशामागे असावे, असा थेट आरोपच नरके समर्थकांनी केला आहे.
या सगळ्या गदारोळात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाच, तर काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्यालाच ही लढाई लढावी लागेल, असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचे बरेच अर्थ लावले जात आहेत.
राहुल पाटील यांनी आपण महायुतीतील घटक पक्षात जात असलो, तरी आपले पारंपरिक विरोधक नरके यापुढेही आपले विरोधक राहतील, असे सांगून त्यांच्या विरोधात विधानसभा लढविण्याची घोषणाच केली.
दरम्यान, चंद्रदीप नरके यांनी महायुतीमध्ये येणार्या प्रत्येकाचे आपण स्वागतच करतो; मात्र राहुल पाटील यांनी जे वक्तव्य केले आहे ते योग्य नाही. याबाबत त्यांच्या पक्षाचे नेते तसेच महायुतीचे नेते त्यांना योग्य ती समज आणि सल्ला देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
पारंपरिक विरोधक समोर येतात तेव्हा अशी वक्तव्ये होत असतात. याचा अनुभव कागलमध्ये आपण समरजित घाटगे यांच्या बाबतीत घेतला आहे. गट टिकविण्यासाठी अशी वक्तव्ये करावी लागतात. त्याशिवाय गट टिकत नाही अशा शब्दांत मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर आपली भूमिका मांडली.