कुडित्रे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येथील मतदान केंद्रावर मतदारांची लागलेली रांग. 
कोल्हापूर

Graduate Constituency Election | करवीर : ६६.८५ टक्के मतदान २२ केंद्रांवर उत्साहात मतदान; अनेक ठिकाणी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

कसबा बावडा : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी करवीर तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडले. तालुक्यातील २२ मतदान केंद्रांवर एकूण ११ हजार ८८१ मतदारांपैकी ७ हजार ९४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे तालुक्यात ६६.८५ टक्के मतदानाची नोंद झाली.

विविध गावांतील पदवीधर मतदारांनी मतदानासाठी केंद्रांवर गर्दी केल्याने निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना करवीर तालुक्यातून विजयी मताधिक्य मिळेल, असा विश्वास महायुतीच्या समर्थकांनी व्यक्त केला.

करवीर तालुक्यातील कणेरी, गडमुडशिंगी, निगवे दुमाला, बालिंगा, कसबा बीड आणि हळदी येथे प्रत्येकी तीन मतदान केंद्रे होती. इस्पुर्ली येथे दोन, तर कुडित्रे आणि सांगरूळ येथे प्रत्येकी एक मतदान केंद्र होते. अशा एकूण २२ केंद्रांवर दिवसभर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पदवीधर मतदार केंद्रांवर दाखल होत असल्याने अनेक ठिकाणी निवडणुकीचे चैतन्यमय वातावरण अनुभवायला मिळाले.

करवीर तालुक्यातील शंभरहून अधिक गावांतील मतदारांची या २२ मतदान केंद्रांवर विभागणी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानासाठी घरापासून दूर असलेल्या केंद्रांपर्यंत प्रवास करावा लागला. अपवाद वगळता बहुतांश मतदारांना चार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करून मतदानासाठी यावे लागले, तरीही मतदारांनी मतदानाबाबत दाखविलेला उत्साह लक्षवेधी ठरला. ग्रामीण भागातील मतदारांनीही मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घेतल्याने मतदानाची टक्केवारी समाधानकारक राहिली.

आता निकालाकडे लक्ष !

तालुक्यातील ११ हजार ८८१ मतदारांपैकी ७ हजार ९४९ मतदारांनी मतदान केल्याने पदवीधर मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग स्पष्ट झाला आहे. ६६.८५ टक्के मतदानाची नोंद झाल्याने या मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. तालुक्यात सर्वाधिक मतदान कुडित्रे येथील कुमार विद्यामंदिर येथे ७१.४० टक्के झाले. महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना करवीरमधून मताधिक्य मिळेल, असा दावा समर्थकांकडून केला जात असला, प्रत्यक्ष निकालानंतरच मतदारांचा नेमका कौल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT