कोल्हापूर : स्त्री मनातील वेदना, संघर्ष, दडपलेल्या भावना आणि आत्मसन्मानाचा शोध अत्यंत संवेदनशीलतेने मांडत ‘करुणाष्टके’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेत अंतर्मुख केले. भद्रकाली प्रोडक्शन निर्मित, लेखक व दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांच्या ‘करुणाष्टके’ या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग दैनिक ‘पुढारी नाट्योत्सवांंतर्गत रविवारी (दि. १२) कोल्हापुरात उत्साहात पार पडला. सायबर कॉलेज कॅम्पस्च्या आनंद भवनाय येथे नाट्योत्सवाचे आयोजन केले आहे.
रविवारी दुसऱ्या दिवशी नाट्योत्सवाचा पडदा ‘करुणाष्टके’ या नाटकाने उघडला. यावेळी नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक पुरुषोत्तम नारायण गाडगीळ व जव्हेरी कोल्हापूरच्या व्यवस्थापक अश्विनी महाजन, सहयोगी प्रायोजक एलआयसी ऑफ इंडियाचे सिनियर डिव्हीजनल मॅनेजर चंद्रप्रकाश पराते, येवलेज मिल्क कॉर्नरचे विजय येवले, विशेष सहकार्य केलेले ड्रीम व्हिजन हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.च्या समृद्धी वाघोलीकर, नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेसच्या आर्या गौतम नागपूरकर आदी उपस्थित होते. सर्व प्रायोजकांच्या वतीने नाटकातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
या नाटकातील प्रसंग केवळ विधवांच्या वेदनेपुरते मर्यादित राहत नाही, तर संगीत, कविता आणि नृत्याच्या माध्यमातून स्त्रीच्या अंतर्मनातील प्रेम, हसणे, रडणे, भावनिक तसेच लैंगिक गरजा यांसारख्या दुर्लक्षित विषयांवर प्रभावी भाष्य करते. स्त्री-संवेदनांचे धाडसी आणि वास्तववादी चित्रण हे या नाटकाचे वैशिष्ट्य ठरले. आजच्या मनोरंजनप्रधान नाटकांच्या प्रवाहात स्त्रीमनाच्या गुंतागुंतीवर इतक्या संवेदनशीलतेने भाष्य करणारे हे नाटक प्रेक्षकांच्या मनाला भिडले. वाड्याची कठोर प्रमुख ‘बाईबाई’ ही भूमिका गीतांजली कुलकर्णी यांनी प्रभावीपणे साकारली, तर बंडखोर ‘दुर्गा’च्या भूमिकेत पर्ण पेठे यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवली. या दोन्ही पात्रांतील वैचारिक संघर्षामुळे नाटक अधिक प्रभावी बनले. कल्याणी मुळे, केतकी सराफ, माधुरी भारती, किरण खोजे, प्रतीक्षा खासनीस, विनायक चव्हाण यांच्याही भूमिका उत्तम झाल्या.
आज नाट्योत्सवाचा समारोप
प्रशांत दामले आणि कविता लाड अभिनित ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाने सोमवार, दि. १३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सायबर कॉलेजमधील आनंद भवन येथे नाट्योत्सवाचा समारोप होणार आहे.