Karad Pharmacist Fraud | कराडच्या फार्मासिस्टची 6.70 कोटींची फसवणूक Pudhari File Photo
कोल्हापूर

Karad Pharmacist Fraud | कराडच्या फार्मासिस्टची 6.70 कोटींची फसवणूक

शेअर मार्केटमधून दणका; अज्ञाताविरुद्ध जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : शेअर्स ट्रेडिंग मार्केटच्या जादा परताव्याचे आमिष दाखवून अजय नंदकिशोर भट्टड (वय 52, रा. शनिवार पेठ, कराड, जि. सातारा) या फार्मासिस्टची 6 कोटी 69 लाख 81 हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत जयसिंगपूर पोलिसांत अज्ञाताविरोधात भट्टड यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबतची माहिती अशी, 5 सप्टेंबर 2025 रोजी अजय भट्टड हे जयसिंगपूर येथील नातेवाईकांकडे आले होते. यावेळी त्यांच्या मोबाईलवर एसआयजी नावाने शेअर्स ट्रेडिंग मार्केट नावाची लिंक आली. त्यांनी लिंक ओपन केल्यानंतर 2 मोबाईल नंबरवरून अज्ञाताने भट्टड यांना व्हॉटस्अ‍ॅपद्वारे कमी रेटमध्ये भारतीय बाजाराचे शेअर्स खरेदी करून दुसर्‍या दिवशी जादा परताव्याचे आमिष दाखविले होते. भट्टड यांनी ते अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांना व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरही अ‍ॅड केले. डिस्काऊंट रेटमध्ये शेअर्स विकत घेण्यास सांगितले. जादा परताव्याचे आमिष दाखवून वेळोवेळी वेगवेगळ्या बँकांच्या खात्यात 6 कोटी 69 लाख 81 हजार रुपये खात्यात भरण्यास भट्टड यांना सांगितले.

मात्र, आजअखेर कोणताही परतावा न देता एसआयजी अ‍ॅपवरून 2 मोबाईल क्रमांकांच्या 2 इसमांनी फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने भट्टड यांनी जयसिंगपूर पोलिसांत धाव घेतली. याबाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT