शिरोळ : मुलीला प्रियकरासोबत पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून कनवाड (ता. शिरोळ) येथे एका तरुणाच्या कुटुंबीयांवर मुलीच्या नातेवाईकांनी दगड व काट्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या हल्ल्यात फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या कुटुंबातील पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी दोन महिलांसह दहा जणांना अटक केली आहे. सर्वांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत अक्षय अशोक कोळी यांनी फिर्याद दिली आहे. गावातील गणेश बनकर याच्यासोबत एक मुलगी पळून गेली. या मुलीला पळून जाण्यास अक्षयने मदत केल्याचा संशयातून जावेद मुजावर, त्याची पत्नी उमरान, असीम चिलू, सादिक मुजावर, आलम मुजावर, नदीम आवटी, तोहीद मुजावर, साद बुरान, लाजम मुजावर यांची पत्नी ( सर्व रा. कनवाड) तसेच सैफअली तराळ (रा. इचलकरंजी) यांच्यासह आणखी चार ते पाच जणांनी फिर्यादी यांच्या घरावर हल्ला करून फिर्यादी कुटुंबीयांना मारहाण केली. यामध्ये आई सुनीता कोळी, वडील अशोक कोळी, चुलती सीमा कोळी, चुलत भाऊ संदीप कोळी, लहान भाऊ ऋषिकेश कोळी यांना जबर मारहाण केली असून ते जखमी आहेत. तसेच घराचे नुकसान केले आहे. फिर्यादी अक्षय कोळी हा गंभीर जखमी झाला असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.