कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी जो विचार रुजवला त्याचा वारसा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत शिवाजी महाराजांबाबत चुकीचे संदर्भ पसरवले जात आहेत. शिवरायांची आर्ग्याहून सुटका या घटनेबाबत वादग्रस्त विधान करणार्यांचे मुंडके छाटून तुळजाभवानीच्या गळ्यात माळ करून घातली पाहिजे, असे आक्रमक वक्तव्य कालिचरण महाराज यांनी केले. बुधवारी कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती मिरवणुकीत सहभाग घेतल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी त्यांनी हिंदू राष्ट्र आणि शिवचरित्र याविषयी परखड मत मांडले. शिवाजी महाराजांच्या विचारानुसार राष्ट्र घडवण्यासाठी हिंदू संघटित झाले, तरच भविष्यात सुरक्षित देशाची मजबूत बांधणी होईल, असा विश्वास कालिचरण महाराज यांनी व्यक्त केला. कालिचरण महाराज म्हणाले, शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य म्हणजे आदर्शाचा वस्तूपाठ आहे. हिंदू समाजाने जातीयवाद, संप्रदायवाद सोडून एकत्र आले पाहिजे. शिवजयंतीच्या उत्सवातील सहभागातून हे संघटन अधिक व्यापक होईल.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना कालिचरण महाराज म्हणाले, विरोधी पक्षात बिनबुडाची वक्तव्ये करणार्यांची संख्या वाढली आहे. अशा विचारांची माणसे विरोधी पक्षात असतील, तरच हिंदू राष्ट्राची स्थापना होईल. सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित छावा सिनेमा गाजत आहे. हा सिनेमा सरकारने करमुक्त करावा, जेणेकरून प्रत्येकाला हिंदूंवर झालेल्या अत्याचाराची जाणीव होईल. यावेळी त्यांनी हिंदूंना असहिष्णू होण्याचे आवाहन केले व महाकुंभ मेळ्यासारख्या सोहळ्यातून हिंदूंच्या संघटनाला बळ येत असल्याचेही त्यांनी सांगितले.