कोल्हापूर : कोल्हापुरातून कोकणात जाणारा कळे-गगनबावडा रस्ता खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनत आहे. जागोजागी असणारे खड्डे चुकविताना वाहनधारक त्रस्त झाले असून, या रस्त्याच्या पॅचवर्कच्या कामालाही मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे.
कळे-गगनबावडा मार्गाच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 18 हेक्टर जमिनीपैकी तब्बल 90 टक्के मोजणी पूर्ण केली आहे. 351 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, ठेकेदारही निश्चित झाला आहे. कोल्हापूर-गगनबावडा या मार्गावर अनेक वर्षांपासून खड्ड्यांचे साम—ाज्य आहे. आजही या मार्गावर फारसे वेगळे चित्र नाही. वारंवार पॅचवर्क करून कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही लोंघे, किरवे, तिसंगी, साखरी, शेणवडे, साळवण, असळज, सांगशी, खोकुर्ले, सैतवडे या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने हा निधी गेला कुठे, असे म्हणायची वेळ आली आहे.
सध्या पॅचवर्कसाठी नऊ कोटी निधी आहे. वर्कऑर्डरचे घोडे कुठे अडले, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. घाटरस्ता असल्याने या मार्गावर ठिकठिकाणी धोकादायक वळणे आणि तीव— उतार आहेत. अशातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहनधारकांना तारेवरील कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघाताचे प्रकार घडत आहेत. सध्या कोल्हापूर-कळे रस्त्याचे दुपदरीकरण अंतिम टप्प्यात आहे; तर करूळ घाट रस्ता पूर्ण झाला आहे. त्यामुळे केवळ कळे ते कोल्हापूर या अंतरातील रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पॅचवर्क अन् रुंदीकरण वर्कऑर्डर गुलदस्त्यातच
या रस्यावर खड्डेे मुजविण्यासाठी सुमारे 9 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. रुंदीकरणासाठी 351 कोटी रुपयांची निविदा आहे. या दोन्ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असूनही केवळ वर्कऑर्डर देण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. ही प्रक्रिया प्रलंबित का, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.