चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला थेट पाईपलाईनने पाणी आले; मात्र या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप व ताराराणी आघाडीकडून करण्यात आला आहे, तर योजनेत भाजपनेच खोडा घातल्याचा प्रत्यारोप काँग्रेसने केला आहे. तसेच गोकुळ दूध संघातील घड्याळ व जाजम खरेदीवरून गैरव्यवहाराचे आरोप झाले. याप्रकरणी आता चौकशी होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणाची अवस्था पाणीही पेटले आणि दुधालाही उकळी फुटली, अशी झाली असून नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाने राजकारणाचा विचका झाला आहे.
कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनने पाणी आणण्याची मागणी खूप वर्षांपासून होत होती. पंचगंगेतील प्रदूषित पाण्यामुळे काविळीसह जलजन्य आजाराने जनतेला ग्रासले होते. काविळीच्या साथीत झालेल्या मृत्यूने सरकारही हबकले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेची सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात असताना आ. सतेज पाटील यांनी पुढच्या निवडणुकीपर्यंत जर थेट पाईपलाईनने पाणी आणले नाही, तर आपण विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे पापाची तिकटी येथे झालेल्या काँग्रेसच्या सभेत सांगितले होते. काळम्मावाडीचे पाणी आले. योजना पूर्ण झाली. मात्र सातत्याने पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने आरोप-प्रत्यारोपांना संधी मिळाली.
भाजप आणि ताराराणी आघाडीने या योजनेत भ्रष्टाचार झाल्याने एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्याचवेळी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित करून मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली भूमिका पार पाडावी, असे म्हटले आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा तसेच काम सुरू असताना त्या त्यावेळी आपण या बाबी निदर्शनास आणल्याचा दावा, या नेत्यांनी केला आहे.
आ. सतेज पाटील यांच्या अट्टहासामुळेच योजनेची वाट लागली असून, या अपयशाबद्दल त्यांनी जनतेची माफी मागण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्याचबरोबर योजना सुचविणारी सल्लागार कंपनी, महापालिका व प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदार या सर्वांची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही करणार असल्याचे भाजप व ताराराणी आघाडीने म्हटले आहे.
त्यावर पलटवार करीत काँग्रेसच्या नेत्यांनी योजनेत एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. त्यामुळे एसआयटीच काय, तर सीबीआय चौकशी करा, असे प्रतिआव्हान भाजपच्या नेत्यांना दिले आहे. भाजपलाच ही योजना व्हायला नको होती. त्यामुळे त्यांनी परवानगी देताना अनेक अडथळे आणले, असा आरोप करीत केवळ काँग्रेसला श्रेय मिळू नये यासाठीच हे आरोप भाजपकडून केले जात असल्याचे म्हटले आहे.
पाणी योजनेत गैरव्यवहार नाही, हे स्पष्ट करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी, असे आवाहन भाजप आणि ताराराणी आघाडीने दिले, तर काँग्रेसच्या नेत्यांनी याप्रकरणी अंबाबाईसमोर येऊन शपथ घेऊ, अशा शब्दांत प्रतिआव्हान दिले आहे.
गोकुळमध्ये निवडणूकपूर्व वातावरणातून आरोपांना बत्ती दिली गेली आहे. 3 कोटी 71 लाख रुपयांच्या जाजम आणि घड्याळ खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेने लावून धरली. विशेष लेखापरीक्षकांकडून याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल पंधरा दिवसांत सादर होणार आहे.