कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये दोन न्यायाधीन बंदींमध्ये जोरदार राडा झाला. गर्दी, मारामारीसह गंभीर रेकॉर्ड असलेल्या आणि राजारामपुरी परिसरात दहशत निर्माण करणार्या अजय अनिल पाथरवट (वय 26, सायबर चौक, राजारामपुरी, कोल्हापूर) याची कारागृहात दोन अंडर ट्रायल कैद्यांनी चांगलीच धुलाई केली. मारहाणीत जखमी झालेल्या सराईताला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
न्यायाधीन बंदी अजय पाथरवट यास मारहाण केल्याप्रकरणी आकाश ऊर्फ अक्षय आनंदा माळी, नीलेश उत्तम माळी यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कळंबा कारागृहातील सर्कल क्रमांक पाचलगत शौचालयाजवळ हा प्रकार घडला.
न्यायाधीन बंदी अजय पाथरवट याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात चौदापेक्षा जादा गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. दि. 26 डिसेंबरला सायंकाळी अजय पाथरवट याने आकाश कृष्णा शिंदे (वय 25, रा. डवरी वसाहत, सायबर चौक, कोल्हापूर) याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. राजारामपुरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली होती.
न्यायालयीन कोठडीचा आदेश झाल्याने त्याची कळंबा कारागृहात रवानगी झाली आहे. बुधवारी (दि. 31) सायंकाळी कळंबा कारागृहात सर्कल क्रमांक पाचजवळ अजय पाथरवट व आकाश माळी, नीलेश माळी यांच्यात वादावादी झाली. संशयित आकाश माळी,नीलेश माळीने पाथरवट यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नीलेश माळी याने काठीने डोक्यावर हल्ला करून त्याला जखमी केले. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजय पाथरवट याच्या फिर्यादीवरून आकाश माळी, नीलेश माळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.