आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : कळंबा कारागृहातून गेल्या काही वर्षांत रजेवर गेलेले ५६ कैदी रजा उपभोगून परतलेले नाहीत. पॅरोल, फर्लो तसेच कोरोना काळात रजेवर गेलेले कैदी अद्याप न परतल्याने कारागृह प्रशासन चिंतेत आहे. या सर्व कैद्यांवर कारागृह प्रशासनाने गुन्हे दाखल केले असून, पोलिस प्रशासन त्यांचा शोध घेण्यात अपयशी ठरले आहे.
शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना कारागृह प्रशासनाकडून पॅरोल आणि फर्लो रजा देण्यात येते. पाच वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना २१, तर पाच वर्षांपेक्षा अधिक शिक्षा असणाऱ्यांना २८ दिवसांची फर्लो रजा मंजूर होते. तर पॅरोल रजा ४० दिवसांची असते. फर्लो रजा कारागृह अधीक्षकांकडून तर पॅरोल रजा कारागृह महानिरीक्षकांकडून मंजूर होते.
पोलिस प्रशासन अपयशी
कारागृहातून सुट्टीवर गेलेल्या कैद्यांचा शोध घेण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे. सहा महिन्यांपूर्वी कारागृहाच्या सर्व्हिंसिंग सेंटरवरून कैदी मोटारीसह पसार झाला होता. पोलिसांनी मोटार जप्त केली; मात्र कैद्याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.
कोरोना काळातील १६ कैदी गायबच
२०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारागृह प्रशासनाने कैद्यांना रजा मंजूर केल्या होत्या. या काळात कळंबा कारागृहातील ४०० हून अधिक कैद्यांना रजा मंजूर केली होती. यापैकी १६ कैदी अद्याप कारागृहात परतले नाहीत.
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील रजा उपभोगण्यासाठी गेलेले ५६ कैदी परत आलेले नाहीत. या सर्व कैद्यांवर कारागृह प्रशासनाच्या वतीने गुन्हे दाखल केले आहेत. तसेच संबंधित कैद्यांच्या पोलिस ठाण्यांनाही याचे स्मरणपत्र पाठविले आहे.विवेक झेंडे, अतिरिक्त कारागृह अधीक्षक