कोल्हापूर : पाईपलाईनद्वारे गॅस जोडणी करताना स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बाधितांना 1 कोटी 70 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलेल्या प्रयत्नाने बाधितांचे कुटुंब पुन्हा उभारणीसाठी मोठा हातभार लागणार आहे. मंजूर झालेली ही भरपाईची रक्कम आठवडाभरात बाधितांच्या खात्यावर जमा होणार असल्याचेही यावेळी येडगे यांनी सांगितले.
कळंबा येथील अमर भोजणे यांच्या घरी 25 ऑगस्ट 2025 रोजी पाईपलाईनमधून गॅस पुरवठ्यासाठी जोडणी केली होती, त्या जोडणीतून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात भोजणे यांची 30 वर्षीय पत्नी, 6 वर्षांचा मुलगा आणि 58 वर्षांचे वडील यांचा मृत्यू झाला. तर त्यांची साडेतीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणाची जिल्हाधिकारी येडगे यांनी गंभीर दखल घेत, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कंपनीला अवघ्या पाच महिन्यांत भरपाई देण्यास भाग पाडले.
जखमी मुलगीला मिळणार 55 लाख
मिळालेल्या भरपाईच्या रकमेची योग्य विल्हेवाट लागेल, या द़ृष्टीने जिल्हाधिकार्यांनी काही अटी घातल्या असून या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या मुलीला भरपाईचे 40 लाख आणि मानसिक यातना म्हणून 15 लाख असे 55 लाख रुपये मिळतील. ही रक्कम संबधित मुलीच्या नावे 18 वर्षे फिक्स डिपॉझिट म्हणून राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवावी लागेल. या रकमेच्या व्याजातून त्या मुलीचा शिक्षणाचा खर्च केला जाणार आहे.
अमर भोजणे यांना मिळणार 65 लाख
या दुर्घटनेप्रकरणी अमर भोजणे यांना पत्नीच्या मृत्यूचे 35 लाख, तर मुलाच्या मृत्यूचे 30 लाख, असे 65 लाख दिले जाणार आहेत. यापैकी 30 लाख रुपये कंपनीने यापूर्वी त्यांना दिले आहेत. उर्वरीत रक्कम त्यांचे नावावर वर्ग केली जाणार आहे.
आईला मिळणार 50 लाख
या दुर्घटनेत भोजणे यांचे वडील मृत झाले. त्याची 25 लाख भरपाई आणि घराचे झालेल्या नुकसानीबाबत देण्यात येणारी 25 लाखांची भरपाई असे 50 लाख रुपये अमर भोजणे यांच्या आईच्या नावे ठेवण्यात येणार आहेत. त्यावरील व्याजातून आईचा खर्च भागवावा, असे आदेशात म्हटले आहे.
अशी आहे भरपाईची रक्कम
मृत शीतल अमर भोजणे : 35 लाख
मृत प्रज्वल अमर भोजणे : 30 लाख
मृत अनंत भोजणे : 25 लाख
जखमी मुलगी : 40 लाख
घर, प्रांपचिक साहित्याचे नुकसान : 25 लाख
मानसिक यातना : 15 लाख
एकूण : 1 कोटी 70 लाख