Kolhapur to Kailash Mansarovar Yatra | करवीर-कैलास परिक्रमेने आत्म्याशी एकरूपतेची अनुभूती Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur to Kailash Mansarovar Yatra | करवीर-कैलास परिक्रमेने आत्म्याशी एकरूपतेची अनुभूती

यात्रेकरूंनी व्यक्त केली भावना

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा कदम

कोल्हापूर : अंबाबाईच्या नगरीतून सुरू झालेला हा प्रवास यात्रेकरूंसाठी साडेतीन हजार किलोमीटर पार करण्याचा नव्हता, तर तो आत्म्याच्या गाभ्यात डोकावण्याची उत्कट अनुभूती देणारा होता... या भावना आहेत कैलास मानसरोवर यात्रेसाठी कोल्हापुरातून गेलेल्या मेजर संजय शिंदे, दिलीप देशपांडे आणि डॉक्टर अजित पाटील यांच्या...

अडथळ्यांचे अनेक डोंगर पार करत असताना, कैलास मानसरोवरापर्यंत पोहोचण्याची ऊर्मी वाढत गेली. कोल्हापुरातील कपिलेश्वर, उत्तरेश्वर, खिद्रापूरचा कोपेश्वर अशा शिव मंदिरांची सलगता आणि नेपाळमधील पशुपतिनाथ व डोरलेश्वर यांच्या दर्शनानंतर कैलास मानसरोवरचा अनुभव मनात साठवत पार्वती पथाची परिक्रमा कोल्हापूरकर यात्रेकरू म्हणून आनंददायी आणि समाधान देणारी होती, अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या. मानसरोवर येथे सूर्याला अर्घ्य देताना अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाची आठवण झाली. मानसरोवरमध्ये आपण सूर्याला अर्घ्य अर्पण करतो, हा संगम मनाला स्पर्शून गेला असे सांगताना या यात्रेकरूंच्या डोळ्यांत तृप्तीचे भाव होते. आपत्कालीन परिस्थितीमुळे डॉक्टर अजित पाटील यांना कोल्हापुरात परतावे लागले, तर मेजर शिंदे व दिलीप देशपांडे 13 रोजी कोल्हापुरात परतणार आहेत.

करवीरातून निघालो तेव्हा वाटले, आपण आईच्या आशीर्वादाने पुढे चाललो आहोत. मानसरोवरावर अर्घ्य अर्पण करताना मात्र जाणवले, हे सर्व काही आपल्या आत्म्याचे महादेवाशी, सूर्याशी आणि सनातनाशी एकरूप होणे आहे, अशी भावना यात्रेकरू मेजर संजय शिंदे यांनी व्यक्त केली. दिलीप देशपांडे म्हणाले, पशुपतिनाथाचे दर्शन घेताना असे वाटले की, करवीरनगरीत जसा अंबाबाईचा श्वास जाणवतो, तशीच इथेही महादेवाची अखंड ऊर्जा अनुभवता येते. डॉ. अजित पाटील म्हणाले, या प्रवासाची प्रत्येक पायरी आयुष्यभरासाठी आत्म्यात कोरली गेली आहे. करवीर ते कैलास ही एक जिवंत साखळी आहे, ती तुटूच शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT