कोल्हापूर : कागल-सातारा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रदीर्घ काळापासून रेंगाळल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आता महामार्गाचा वापर चक्क शेणी थापण्यासाठी, गुरे बांधण्यासाठी, तसेच किरकोळ साहित्य ठेवण्यासाठी सुरू केलेला दिसत आहे.
2022 साली सुरू झालेले कागल-सातारा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम चार वर्षे झाली, तरी अजून पूर्ण झालेले नाही. गेल्या सात-आठ महिन्यांपासून तर हे काम जणू काही ठप्पच झालेले आहे. महामार्गाच्या नियोजित कामकाजातील बदल, नव्याने होत असलेली काही उड्डाणपुलांची कामे, भूसंपादन यासह वेगवेगळ्या कारणांनी रुंदीकरणाचे काम रेंगाळले असल्याचे राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी सांगत असतात. मात्र, गेल्या सात-आठ महिन्यांपासून हे काम नुसते रेंगाळलेले नाही, तर चक्क बंद पडलेले दिसत आहे. कधीतरी कुठेतरी एखादा जेसीबी घरघरताना आणि चार-दोन कामगार काहीतरी किरकोळ कामे करताना दिसत आहेत.
सध्या या महामार्गावरील सगळी वाहतूक पर्यायी सेवा रस्त्यांवरून सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामासाठी म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या महामार्गावरील जवळपास सगळी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. मात्र, एकीकडे रुंदीकरणाचे कामही बंद आहे आणि दुसरीकडे या जुन्या महामार्गावरील वाहतूकही बंद आहे. त्यामुळे या महामार्गाच्या लगतच्या गावांमधील लोकांनी आता जुन्या महामार्गाचा वापर स्वत:च्या सोयीनुसार सुरू केल्याचे दिसत आहे. कुठे या महामार्गावर लोकांनी आपापले किरकोळ साहित्य ठेवून दिलेले दिसत आहे, कुठे महामार्गाचा वापर पार्किंगसाठी सुरू आहे, कुठे या महामार्गावर गुरे बांधली जात आहे, तर आणखी कुठे या महामार्गावर चक्क शेणी थापलेल्या दिसत आहेत. यावरून आज या महामार्गाची काय अवस्था असेल, त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही.
या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात आलेल्या अडचणी कधी दूर होणार आणि रुंदीकरणाचे काम पुन्हा कधी मार्गी लागणार, याचे उत्तर आजघडीला तरी कोणाकडेच नाही. या कामाचे ठेकेदार तर जणू काही गायबच आहेत. होते ते कामगारही हळूहळू कमी होताना दिसत आहेत. पूर्वी कामावर असलेली वेगवेगळी यंत्रे हळूहळू गायब होताना दिसत आहेत. त्यामुळे हे काम नक्की कधी पूर्ण होणार, याची कोणतीही शाश्वती राहिलेली दिसत नाही.
महामार्गावरील शेणी बनतायत थट्टेचा विषय..!
महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकातील याच महामार्गाची कामे अतिशय चांगल्या दर्जाची झालेली आहेत. महामार्गाच्या दुतर्फा सेवारस्ते, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, ठिकठिकाणी स्वच्छतागृहांचीही सोय आहे. अशा महामार्गावरून प्रवास करून महाराष्ट्रात प्रवेश केला की, याच महामार्गाचे इथले विदारक दृश्य बघायला मिळते. महामार्गावर बांधलेली गुरे आणि थापण्यात आलेल्या शेणींमुळे तर हा महामार्ग आजकाल थट्टेचा विषय बनला आहे.