सुनील कदम
कोल्हापूर : कागल-पुणे महामार्गावरील कागल ते कासेगावपर्यंतच्या रस्त्याच्या नुसत्या ‘चिंध्या’ झाल्या आहेत. रस्त्यावर पडलेली भली मोठी भगदाडे, उड्डाणपुलांची, रुंदीकरणाची आणि सेवारस्त्यांची अर्धवट बांधकामे यामुळे हा महामार्ग अक्षरश: जीवघेणा बनलेला आहे.
बहुतांश कामे अर्धवट!
कासेगावपासून पेठनाक्यापर्यंत सात भुयारी मार्ग आहेत. या ठिकाणी उड्डाणपुलांची कामे मागील अडीच ते तीन वर्षांपासून सुरू आहेत, पण त्यात फारशी प्रगती होताना दिसत नाही. सगळी वाहतूक सेवा रस्त्यांवरून सुरू आहे, पण सेवा रस्त्यांची अवस्था भयावह म्हणावी, अशा स्वरुपाची आहे. पेठनाका ते येलूरपर्यंत रुंदीकरणाचे काम बर्यापैकी पूर्ण झाले आहे. या मार्गावर पडलेले खड्डे रस्त्याचे काम काय दर्जाचे झाले असावे, हे ठळकपणे दाखवून देतात. त्यातही पुन्हा येडेनिपाणी फाटा उड्डाणपुलाचे काम रखडलेलेच आहे.
येलूर ते वाठार दैन्यावस्था!
येलूरच्या भुयारी मार्गाचे व उड्डाणपुलाचे काम बराच काळ रेंगाळलेले आहे. त्यामुळे येथील सगळी वाहतूक सेवा रस्त्यांवरच विसंबून आहे. पण त्यांची अवस्था दुहेरी वाहतुकीस पुरेशी ठरत नाही. त्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा ठरलेलाच असतो. किणी येथील ओढ्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे की बंद आहे, तेच समजून येत नाही. कारण मागील अडीच-तीन वर्षांत इथे फारशी प्रगती झालेली दिसत नाही. तांदुळवाडी ते किणी टोलनाका हा रस्ता तर खरोखरच मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी फूट-दीडफूट खोलीची आणि दोन-तीन फूट रूंदीची शेकडो भगदाडे पडली आहेत. या खड्ड्यातूनवाहन गेले की, गाडीचे एक-दोन पार्ट निकामी झालेच म्हणून समजा. दुचाकीस्वार खड्ड्यात गेला, तर त्याचा कपाळमोक्ष ठरलेलाच.
उड्डाणपुलांचे नुसतेच सांगाडे!
वाठार ते शिये फाट्यापर्यंतही अनेक बांधकामे अर्धवट आहेत. अंबप फाटा आणि टोप येथे तर उड्डाणपुलांचे सांगाडे दोन-तीन वर्षांपासून नुसतेच उभा आहेत. नागावफाटा आणि सांगलीफाटा या ठिकाणीही उड्डाणपुलांचे सांगाडे मागील दीड-दोन वर्षांपासून नुसतेच उभा आहेत. उड्डाणपुलांच्या या सांगाड्यांचा वाहतुकीला मात्र मोठा अडथळा ठरत आहे. कासेगावपासून कागलपर्यंत ‘एक ना धड-भाराभर चिंध्या’ अशा स्वरुपाची शेकडो बांधकामेे अर्धवट अवस्थेत पडून आहेत.
टोलनाक्याच्या दारातच दैना
किणी येथे टोलनाका सुरू आहे, पण या टोलनाक्याच्या उत्तर दिशेला दीड-दोन किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्यावर भलेमाठे खड्डे पडले आहेत, ठिकठिकाणी दहा-वीस फुटांच्या भेगा पडल्या आहेत, ठिकठिकाणी रस्ता उखडून गेला आहे. तरीदेखील या रस्त्यावरून आदळआपट करीत येणार्या वाहनांना किणी टोलनाक्यावर टोल द्यावा लागतोच. त्यामुळे अशा रस्त्यावर टोल नेमका द्यायचा तरी कशासाठी, असा वाहनधारकांचा रास्त व रोकडा सवाल आहे.
महामार्गाचा वापर चक्क शेणी थापण्यासाठी..!
एकीकडे महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम जवळपास बंद आहे आणि दुसरीकडे जुन्या महामार्गावरील वाहतूकही बंद आहे. त्यामुळे या महामार्गाच्या लगतच्या गावांमधील लोकांनी आता जुन्या महामार्गाचा वापर स्वत:च्या सोयीनुसार सुरू केल्याचे दिसत आहे. कुठे या महामार्गाचा वापर पार्किंगसाठी सुरू आहे, कुठे या महामार्गावर गुरे बांधली जात आहेत, तर कुठे या महामार्गावर चक्क शेणी थापलेल्या दिसत आहेत. यावरून आज या महामार्गाची काय अवस्था असेल, त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही.