सिद्धनेर्ली: कागल तालुक्यातील राजकीय पटलावर मोठी घडामोडी घडली असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रस्थापित महायुतीच्या विरोधात 'तिसरी इंडिया आघाडी' मैदानात उतरली आहे. तालुक्यातील राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्ष, विविध संघटना आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत ही नवी मोट बांधली आहे. नुकत्याच सिद्धनेर्ली (ता कागल) येथील कामगार भवनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला असून, यामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार आहे.
या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीसाठी जागावाटप, उमेदवारी निश्चिती आणि आघाडीचा किमान समान कार्यक्रम यावर सविस्तर चर्चा करून निर्णायक घोषणा करण्यात आली. तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांनी केलेल्या तत्वहीन युती आणि स्वार्थाच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. या पार्श्वभूमीवर, 'तिसरी इंडिया आघाडी' हा मतदारांसमोर एक सक्षम पर्याय असेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आघाडीच्या वतीने सर्व मतदारसंघातून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.
तालुक्यातील सध्याच्या गट-तटाच्या राजकारणामुळे आणि नेत्यांवरील अविश्वासामुळे मतदार नव्या पर्यायाच्या शोधात आहेत. ही पोकळी भरून काढण्यासाठी नोंदणीकृत पक्ष आणि चळवळीतील संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील उर्वरित समविचारी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी या आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीत लाल बावटा संघटना व माकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. शिवाजी मगदूम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. दयानंद पाटील-नंद्याळकर, शिवसेना (उबाठा) जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे, तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, मनसे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डॉ. बाळासाहेब पाटील, तानाजी मगदूम आणि वंचित बहुजन आघाडीचे राज कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेऊन चर्चेत भाग घेतला.
यावेळी व्यासपीठावर अशोक पाटील, अविनाश मगदूम, नामदेव भराडे, प्रभू भोजे, नितेश कोगनोळी, ॲड. संदीप चौगुले, शिवतेज विभुते, सचिन घोरपडे, इंद्रजित घाटगे, अशोक शिरोळे, राहुल घराळ यांच्यासह तुकाराम शिंदे यांसारखे अनेक प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या आघाडीमुळे कागलमधील प्रस्थापित सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.