कागल : कागल - निढोरी राज्यमार्गावरील बेकायदेशीर गांजा, दारू, गुटखा आणि आता प्राण्यांची अवैध वाहतूक चव्हाट्यावर आली असून बेकायदेशीर वाहतुकीसाठी हा मार्ग सध्या अनेकांना सुरक्षित वाटू लागला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे.
या राज्यमार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. कोकणात जाण्यासाठी तसेच बाळूमामांच्या दर्शनाकरता, नवीन झालेले औद्योगिकीकरण अशा अनेक कारणांमुळे येणा-जाणाऱ्या भाविकांची व प्रवाशांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे महामार्गावर असलेले विविध प्रकारचे टोल नाके चुकवण्याकरता या मार्गाचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे वाहने अतिशय वेगाने धावत असतात. वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक ठरू लागला आहे. या मार्गावरील अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.
अनेक ठिकाणी हा मार्ग अरुंद तसेच धोकादायक वळणाचा देखील झाला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठमोठे वृक्ष तोडून दोन्ही बाजूंचा रस्ता बोडका केला आहे. मात्र रुंदीकरणाचा अद्याप पत्ता नाही, मात्र या मार्गावर अनेक वेळा कर्नाटकातून आणल्या जाणाऱ्या गांजाची आणि बेकायदेशीर दारूची वाहतूक उघडकीस आली आहे. महाराष्ट्र - कर्नाटक सीमेलगत असलेल्या कर्नाटकातील गावातून सर्रासपणे गुटख्याची वाहतूक होत असते. पोलिसांनी अशाप्रकारे आलेला गुटखा अनेक वेळा पकडला आहे.
या मार्गावरून आता बेकायदेशीर प्राण्यांची वाहतूक होत असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. कमी दरात बकरी खरेदी केली जाते आणि त्याची बंगळूर आणि कर्नाटकातील इतर राज्यांत जादा दराने विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात आहे. बेकायदेशीर बकरी वाहतूक करण्याकरता खास तीन मजली कंटेनर बनवण्यात आलेला आहे. एका कंटेनरमध्ये साडेतीनशेहून अधिक बकरी कोंबून भरण्यात येतात.
व्हन्नूर येथे अपघात झाल्यानंतर 200 बकरी जागीच ठार झाली. रात्रभर कंटेनर चालवल्यामुळे चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि पहाटे अपघात झाला. त्यानंतर हा प्रकार चव्हाट्यावर आला. बेकायदेशीर प्राण्यांची वाहतूक रात्रीस सुरू आहे. बकऱ्याप्रमाणेच इतर जनावरे आणि प्राण्यांचे वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा आहे आतापर्यंत आरटीओ आणि पोलिस यांचे दुर्लक्ष कसे काय झाले, याचीही चर्चा आहे. महामार्गावरील टोल नाके चुकवण्याकरता निष्पाप प्राण्यांचा रस्त्यावरच क्रूरतेने बळी गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतले आहे.