कागल: येथील आरटीओ चेक पोस्ट खासगी नाक्यासमोर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले दोन्हीकडील महामार्ग संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अडथळे काढून पुन्हा सुरू केले; परंतु नाका प्रशासनाने सायंकाळी पुन्हा निपाणीकडून कागलकडे जाणारा एकच मार्ग बॅरिकेड लावून बंद केला.
सतत होत असलेल्या अपघाताबाबत नागरिकांमधून तीव संताप व्यक्त होत होता. अपघातांचे वाढत्या प्रमाणाबाबत पोलीस, सामाजिक संघटना, प्रवासी संघटना यांनी नाका प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती केली; परंतु त्यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेतली नाही. त्यामुळे शेतकरी आणि प्रवाशांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कागल पोलीस ठाण्यामध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात नाका प्रशासन व इतर संबंधितांच्या आयोजित बैठकीत तत्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष केले. महामार्गावरील दोन्हीकडील अडथळे काढून टाकल्यामुळे अवजड वाहने नाक्याकडे, तर प्रवासी वाहने सरळ जात होती.