Kagal tourism destination | कागल आता पर्यटनाचे नवे डेस्टिनेशन 
कोल्हापूर

Kagal tourism destination | कागल आता पर्यटनाचे नवे डेस्टिनेशन

ओसाड माळावर घडला चमत्कार; म्युझिकल फाऊंटन, बोटिंगचा थरार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : एखादी ओसाड जागा किंवा दुर्लक्षित पाझर तलाव यांची महाराष्ट्रात कमतरता नाही. मात्र, जिद्द, दूरद़ृष्टी नेतृत्व आणि कल्पकतेची जोड मिळाली, तर त्याच ओसाड जागी नंदनवन फुलू शकते, हे कागल नगरपरिषदेने कृतीतून सिद्ध केले आहे. 1972 च्या दुष्काळी कामांचा भाग म्हणून आकाराला आलेला एक साधा पाझर तलाव आज केवळ कागलचेच नव्हे, तर दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील पर्यटनाचे प्रमुख ‘डेस्टिनेशन’ ठरत आहे.

बदलत्या काळातील पर्यटनाची गरज आणि लोकांचा ओढा ओळखून एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेने राबवलेला हा प्रकल्प विकासाचे एक वेगळे आणि नावीन्यपूर्ण मॉडेल म्हणून समोर आला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कागल नगरपरिषदेने हा नावीन्यपूर्ण प्रकल्प साकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच या प्रकल्पाला भेट देऊन कौतुक केले. केवळ रस्ते आणि गटारींच्या पलीकडे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत विकास कसा साधावा, याचे उत्तम उदाहरण या प्रकल्पाने ठेवले आहे.

संकटातून सुचली ‘धबधब्याची’ कल्पना

या प्रकल्पाची कथा एखाद्या चित्रपटासारखी आहे. 2016 मध्ये कागल नगरपरिषदेने नगरसेवक प्रवीण काळबर यांच्या मागणीवरून तलावाच्या सांडव्याची उंची वाढवण्यात आली; पण तलावाच्या मागील बाजूला शेतकर्‍यांची पिके बुडायला लागली. नुकसान टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतकर्‍यांनी तलावाला चर मारून तलाव फोडला. त्या फुटलेल्या सांडव्यातून उंचावरून कोसळणारे पाणी पाहून काळबर यांना येथे ‘धबधबा’ होऊ शकतो ही कल्पना सुचली. त्यांनी ही संकल्पना मुश्रीफ यांच्यासमोर मांडली. मुश्रीफ यांना ही संकल्पना आवडली आणि त्यांनी काळबर यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाखाली या एका ऐतिहासिक पर्यटनाच्या प्रवासाला सुरुवात झाली.

गोल्डन बीचसह बोटिंगचे आकर्षण

सुरुवातीला 12 कोटींच्या निधीतून आकाराला आलेल्या या प्रकल्पात पर्यटकांना भुरळ घालणार्‍या अनेक गोष्टी आहेत. भव्य कासवाकृतीच्या तोंडातून 70 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा खास करून उन्हाळी पर्यटकांना खेचून घेत आहे. धबधब्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर स्त्री- पुरुषांसाठी स्वतंत्र सुसज्ज अशा चेंजिंग रुम्स उभारण्यात आल्या आहेत. पुढील काळात या प्रचंड कासवाच्या पोटाखाली रेन डान्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. गोव्याच्या समुद्रकिनार्‍याची आठवण करून देणारा वाळूचा किनारा (बीच) आणि तलावाच्या संथ पाण्यात बोटिंगचा आनंद पर्यटकांना घेता येतो. रात्रीच्या नौकाविहारासाठी असलेल्या रोषणाई केलेल्या बोटी पर्यटकांना अद्भुत अनुभुती देतात. सुरक्षेसाठी सर्व पर्यटकांना लाईफ जॅकेट देण्यात येतात. आवाजानुसार उंच जाणारे आणि संगीताच्या तालावर थिरकणारे कारंजे रात्रीच्या वेळी पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. मॅजिक शोदेखील अबालवृद्धांचा पर्यटनाचा आनंद द्विगुणित करत आहे. स्थानिक चवींचा आस्वाद घेण्यासाठी येथे सुसज्ज खाऊ गल्ली आणि रेस्टॉरंटची सोय आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात आला आहे. सुरुवातीच्या प्रशासकीय मान्यतेनंतर राज्यात राजकीय स्थित्यंतरे आली. निधीला स्थगिती येण्याची भीती निर्माण झाली. तरीही तांत्रिक लढा देऊन हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. या प्रकल्पात सध्या सुट्टीच्या दिवशी 5 ते 6 हजार, तर सामान्य दिवशी 3 हजार पर्यटक हजेरी लावतात. यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असून, शहराच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाली आहे.

आगामी आकर्षण

आगामी काळात या प्रकल्पात ‘ग्लास ब्रिज’ (काचेचा पूल), रेन डान्स, कपल गार्डन, सुनामी बीच,पॅरा ग्लायडिंग, अ‍ॅडव्हेंचर गेम्स आणि आकर्षक सेल्फी पॉईंटस् साकारण्याचे नियोजन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT