नवी दिल्ली : कागल शहरात राष्ट्रीय महामार्ग-48 वर दोन्ही बाजूस 3-लेन काँक्रीट सर्व्हिस रस्त्यासह 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि. 14) दिली. यासाठी 357.99 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या कामाची वर्क ऑर्डर लवकरच निघणार आहे.
‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, राष्ट्रीय महामार्ग-48 हा भारताच्या गोल्डन क्वाड्रिलॅटरल महामार्ग नेटवर्कमधील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, तो दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूर, चेन्नई या प्रमुख शहरांना जोडतो. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे फाईव्ह स्टार एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या भागात व्यापार व उद्योग झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असून, प्रचंड वाहतूक कोंडी व प्रदूषणातही वाढ होत आहे. याचा परिणाम आपत्कालीन सेवांवरदेखील होत आहे, असे ते म्हणाले.
उपरोक्त मंजूर करण्यात आलेल्या एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे लांब अंतराची जलद वाहतूक वेगळी होणार असून, स्थानिक वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. यामुळे प्रवासी व मालवाहतुकीसाठी गतिमान व सुरक्षित प्रवास शक्य होईल. तसेच, इंधन बचत होऊन प्रवासाचा वेळही कमी होईल. परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या उन्नत महामार्गामुळे या भागातील उत्पादकता वाढेल, आर्थिक सुबत्ता वाढेल व आपत्कालीन सेवा कार्यक्षमतेने पुरवता येतील. यामुळे देशांतर्गत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल आणि मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल, असे त्यांनी म्हटले.