विशाळगड : सुभाष पाटील
परळे निनाई ते पाटणे दरम्यानच्या बावीस गावांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करणाऱ्या परळे निनाई येथील कडवी मध्यम प्रकल्पात आजमितीला ५७.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. योग्य पाणी व्यवस्थापनामुळे यावर्षी पाणीटंचाई भासणार नाही, अशी माहिती कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली.
कडवी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ७१.२४० दलघमी (२.५१ टीएमसी) इतकी आहे आणि दरवर्षी हे धरण तुडूंब भरते. गेल्या वर्षी धरण तीन वेळा ओव्हरफ्लो झाले होते. सद्यस्थितीत धरणाची पाणीपातळी ५९४.०९ मीटर नोंदवण्यात आली आहे. सध्या धरणात ४१.३० दलघमी (१.४३ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी १.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीपेक्षा किंचित कमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
कडवी धरण परळे निनाई, भेंडवडे, लोळाणे, पुसार्ळे, आळतूर, करूंगळे, वालूर, निळे, कडवे, येलूर, पेरीड, गाडेवाडी, मलकापूर, कोपार्डे, शिरगाव, सांबू, मोळवडे, सावर्डे, सवते, सावे, पाटणे आणि शिंपे या गावांसाठी जीवनदायिनी ठरले आहे.
या व्यतिरिक्त मलकापूर नगरपालिका आणि उदय साखर कारखान्यालाही याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे धरणातील पाणीसाठा कधीही शून्यावर आलेला नाही, हे विशेष उल्लेखनीय आहे.
पाणी साठवणुकीसाठी कडवी नदीवर वालूर, सुतारवाडी, येलूर, भोसलेवाडी, शिरगाव, कोपार्डे, पाटणे आणि सवते-सावर्डे या आठ ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत.
परळे निनाई ते पाटणे दरम्यानच्या गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि पिण्यासाठी दरमहा अंदाजे दहा-बारा टक्के पाण्याची गरज भासते. त्यामुळे, सध्याच्या पाणीसाठ्यानुसार पावसाळ्यापर्यंत पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही, असा विश्वास व्यक्त होत आहे.
"प्रकल्पातील सध्याची पाणी पातळी समाधानकारक असली तरी, प्रत्येकाने जबाबदारीने वागून पाण्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही."खंडेराव गाडे, शाखा अभियंता कडवी धरण