जोतिबाच्या नावानं चांगभलं’ 
कोल्हापूर

Jyotiba Chaitra Yatra | गुलालाची उधळण... वरुणराजाचेही आगमन

सुमारे वीस वर्षांनंतर जोतिबावर ऐतिहासिक यात्रेची अनुभूती

पुढारी वृत्तसेवा

जोतिबा : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा लाखो मुखांतून होणारा गजर..., गुलाल-खोबर्‍यांच्या उधळणीने झालेला गुलाबी आसमंत..., डोळ्यांचं पारणं फेडणारी सासनकाठ्यांची मिरवणूक अन् त्यापाठोपाठ राजेशाही थाटात निघालेली पालखी व त्याचवेळी झालेल्या वरुणराजाच्या आगमनाने दख्खनचा राजा अर्थात जोतिबाची चैत्र यात्रा अपूर्व उत्साह अन् जल्लोषात पार पडली. यात्रेत विविध राज्यांतून सुमारे सात लाख भाविकांनी उपस्थिती लावल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली.

सासनकाठ्यांच्या दिमाखदार मिरवणुकीत भाविकांचा अभूतपूर्व उत्साह मिरवणुकीत पहिला मान पाडळी (जि. सातारा) येथील सासनकाठीचा होता. त्यानंतर मौजे विहे (ता. पाटण), करवीर कोल्हापूरचे हिम्मतबहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्यासह मानाच्या एकूण 108 सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या.

पालखी सोहळ्याचे मार्गक्रमण

सासनकाठ्यांच्या उत्साही मिरवणुकांनतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखी सोहळा यमाई मंदिराकडे लवाजम्यासह रवाना झाला. पालखी सव्वासहा वाजता सड्यावरील ‘श्रीं’च्या विसाव्याच्या ठिकाणी थांबली. सूर्यास्त झाल्यानंतर हिलाल दिवटीच्या प्रकाशात दख्खनचा राजा जोतिबा देवाचा पालखी सोहळा यमाई मंदिराकडे जाऊन तेथील सदरेवर विराजमान झाला. रात्री आठ वाजता यमाई मंदिरातून पालखी जोतिबा मंदिराकडे परतली. रात्री 9 वाजता जोतिबा मंदिरातील सदरेवर पालखी ठेवल्यानंतर ढोली, डवरी यांनी देवतांच्या पदांचे गायन केले.

भाविकांचा पुजार्‍यांच्या घरीच नैवेद्य

जोतिबा चैत्र यात्रेसाठी आलेल्या बहुतांश भाविकांनी जोतिबा डोंगरावर मुक्काम करून येथील पुजार्‍यांच्या घरी राहून नैवेद्य करून प्रसादाचा आस्वाद घेतला.

तोफेची सलामी

सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मानाच्या सर्व सासनकाठ्या यमाई मंदिराकडे पोहोचल्या. पावणेसहा वाजता चैत्र यात्रेच्या पालखी सोहळ्यासाठी मानकरी तोफेची सलामी तोफखाना प्रमुख प्रवीण डबाने यांनी दिली. यानंतर मुख्य पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. परंपरेप्रमाणे पालखीच्या पुढील बाजूस बांबवडे (ता. पलूस, जि. सांगली) येथील संकपाळ-पाटील हे, तर मागील बाजूस ढवळी (ता. तासगाव, जि. सांगली) येथील सावंत-पाटील हे मानकरी होते.

मंत्री शंभूराज देसाई यांचा संताप

मंत्री शंभूराज देसाई सासनकाठी पूजनावेळी सालाबादप्रमाणे आले होते. पण प्रशासनाने प्रोटोकॉल न पाळल्याने दर्शनानंतर त्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला.

पावसात रंगला पालखी सोहळा

दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या पालखी सोहळ्याला पाऊस पडतो अशी ख्याती आहे. बुधवारी दुपारी 3 वाजता सासनकाठ्यांची मिरवणुकीनंतर पालखी मानकर्‍यांनी पालखी उचलताच पावसाने हजेरी लावली. दोन तासांहून अधिक काळ बरसलेल्या पावसाने डोंगर धुऊन निघाला. पावसात चिंब झालेले भाविक मात्र पालखी मार्गावरच खिळून राहिले.

महाभिषेक अन् वीरासनात पूजा

बुधवारी यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे पाद्यपूजा, काकड आरती सोहळा झाला. तहसीलदार माधवी शिंदे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक धैर्यशील तिवले आणि ‘श्रीं’चे पुजारी यांच्या हस्ते जोतिबास शासकीय महाभिषेक करण्यात आला. यानंतर जोतिबाची राजेशाही पद्धतीची वीरासनातील पूजा बांधण्यात आली होती.

बा जोतिबा... शेतकर्‍याला सुखी ठेव; मंत्री शंभूराजेंचे साकडे

जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत, यासाठी राज्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दख्खनचा राजा श्री जोतिबाकडे मंत्री शंभूराज देसाई यांनी साकडे घातले. राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्यसंपन्न, सुखी व आनंदी राहू दे, अशी प्रार्थना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT