कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर परिसर विकासाला आता गती येणार आहे. एकूण 252 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला सोमवारी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे विकास आराखड्यातील सर्व निधी आता नियोजन विभागाकडूनच दिला जाणार आहे.
252.09 कोटींंच्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर मंदिर विकास आराखड्याला राज्य शासनाने 28 मे 2025 रोजी मान्यता दिली होती. यापैकी 81.60 कोटी रुपयांची कामे नियोजन विभागाकडून करण्यास मान्यता देण्यात आली होती, तर उर्वरित कामे संबंधित विभागाकडून केली जाणार होती. पहिल्या टप्प्यातील 81 कोटी 60 लाख रुपयांच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उर्वरित 16 कामांसाठी 170 कोटी 49 लाखांची कामेही नियोजन विभागाकडूनच केली जावी, नियोजन विभागानेच निधी द्यावा, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीला नोव्हेंबरमध्ये सादर केला होता. पाच मार्च रोजी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.