कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाचा डोंगर परिसर देशी वाणांच्या झाडांनी बहरणार आहे. दहा हजार झाडे लावून डोंगर संवर्धन केले जाणार आहे, त्यातून ‘दख्खन केदारण्य’ तयार केले जाणार आहे. या उपक्रमासह श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरण शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.5) दुपारी चार वाजता तोरणाई कडा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला फडणवीस आणि गडकरी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.
जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्याच्या 259 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याला राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. यामध्ये जोतिबा डोंगर परिसरात मदख्खन केदारण्यफची निर्मिती केली जाणार आहे. विविध देशी वाणांची लागवड करून परिसर हिरवागार केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याकरीता दहा हजार झाडे दिली जाणार आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून याचा उद्या गुरूवारी प्रारंभ केला जाणार आहे. पहिल्या दिवशी 500 झाडे लावण्यात येणार असून टप्प्याटप्याने दहा हजार झाडे लावली जाणार आहेत. जोतिबा डोंगरावरील माती, वातावरण, पाण्याची गरज आदींनूसार देशी वाणांपैकी कोणत्या झाडांसाठी हा परिसर अधिक उपयुक्त आहे, याचा अभ्यास करून, तज्ञांच्या सल्लाने आंबा, वड, पिंपळ, जांभूळ, चिंच आदींसह अन्य झाडांची निवड केली आहे. त्यानूसार कोणती झाडे कोठे लावायची, किती अंतरावर लावायची आदीचाही आराखडा तयार केला असून त्यानूसार ही झाडे लावली जाणार आहेत. लावण्यात येणारी झाडांचा वयोगटही निश्चित केला आहे.