जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची रविवारी पाकाळणीने सांगता झाली. यावेळी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर आणि गुलाल-खोबर्याची उधळण करत जोतिबा डोंगर गुलालाने न्हाऊन गेला. दरम्यान, सोमवारी दुपारी 3 पर्यंत जोतिबा मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.
पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. प्रचंड उन्हातदेखील असंख्य भाविकांनी कुलदैवत श्री जोतिबाचे दर्शन घेतले. दर्शनासाठी दर्शनमंडपा बाहेरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
सकाळी 8 वाजता ‘श्रीं’ना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर श्रींची खडी अलंकारिक राजेशाही थाटातील महापूजा बांधली. दुपारी साडेअकरा वाजता ‘श्रीं’चा धुपारती सोहळा झाला. भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली. सायंकाळी श्री जोतिबाचा पालखी सोहळा भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात झाला. यावेळी देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, सिंधिया देवस्थान समितीचे व्यवस्थापक अजित झुगर, गावकर प्रतिनिधी, पुजारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.