जोतिबा डोंगर : जोतिबा डोंगर येथे खंडेनवमीनिमित्त बुधवारी पहिला पालखी सोहळा उत्साहात साजरा झाला. पहाटे तीन वाजता घंटानाद होऊन मंदिर खुले झाले. यानंतर श्रींची पाद्यपूजा व काकड आरती सोहळा पार पडला. पहाटे पाच ते सहा या वेळेत ‘श्रीं’ना महाभिषेक घालण्यात आला. यावेळी श्रीकृष्ण रूपातील महापूजा बांधण्यात आली.
सकाळी श्रींचा पहिला पालखी सोहळा मंदिरात प्रदक्षिणा पूर्ण करून धार्मिक विधीने झाला. यानंतर धुपारती सोहळा, मंदिरातील धार्मिक विधी पार पाडून उंट, घोडे, पुजारी, मानकरी यांसह लवाजमा यमाई मंदिराकडे निघाला. तिथे धार्मिक विधी होऊन श्री तुकाईदेवी मंदिराकडे लवाजमा मार्गस्थ झाला व नंतर जोतिबा मंदिरात आला. मंदिरातील धार्मिक विधी पार पडल्यानंतर तोफेची सलामी देऊन नवरात्रौत्सवाची सांगता झाली.
दिवसभर श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, देवस्थान समितीचे इन्चार्ज धैर्यशील तिवले, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास कोडक, दहा गावकरी प्रतिनिधींसहित ग्रामस्थ, भाविक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.