कोल्हापूर : जोतिबा विकास आराखड्याच्या 500 कोटींच्या पहिल्या टप्प्याला बुधवारी वित्त विभागाच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबईत झालेल्या या बैठकीत विकास आराखड्यातील 273 कोटींच्या, तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्या जाणार्या 227 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. हा आराखडा आता मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या उच्चस्तरीय समितीपुढे सादर केला जाणार आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध— प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर परिसर आणि परिसरातील गावांचा विकास करण्यात येणार आहे. याकरिता प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे. त्याचा 1,700 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा वित्त विभागाच्या उच्चाधिकार समितीसमोर सादर करण्यात आला होता. यामध्ये समितीने काही त्रुटी काढल्या होत्या, काही सूचना केल्या होत्या. समितीने सुचवलेल्या त्रुटी दूर करून, समितीच्या सूचनेप्रमाणे फेरआराखडा बुधवारी झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला.
वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जोतिबा विकास आराखड्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादरीकरण केले. यानंतर आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील 273 कोटींच्या विविध विकासकामांना मान्यता देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी करण्यात येणार्या 227 कोटी रुपयांच्या कामांनाही या समितीने मंजुरी दिली. यामुळे जोतिबा विकासासाठी 500 कोटींच्या कामांना वित्त विभागाची मान्यता मिळाली. वित्त विभागाच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता दिल्यानंतर लवकरच हा आराखडा मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीसमोर जाणार आहे. यानंतर तो अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशीही शक्यता असून पावसाळ्यानंतर पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष कमालाही सुरुवात होईल, अशीही शक्यता आहे. या बैठकीला मंत्रालयातील संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अभियंता सुयश पाटील आदी उपस्थित होते.
जोतिबा डोंगरावरील सात तलावांचे संवर्धन व सुशोभीकरण, केदार विजय गार्डन सुशोभीकरण, चार बाजूच्या पायवाटा दुरुस्ती, परिसरात थिएटर, बसस्थानकात सुविधा, पाणपोई व्यवस्था, डॉरमिटरी व्यवस्था, कम्युनिटी यंत्रणा, सांस्कृतिक हॉल व स्वच्छतागृहे.