कोल्हापूर : वाडीरत्नागिरी (ता. पन्हाळा) येथे होणाऱ्या श्रीक्षेत्र जोतिबाच्या यात्रेसाठी यात्रा मार्गावर 1500 पोलिस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण केले असून, तयारी अंतिम टप्पात आली आहे. 30 मार्चपासून 1 एप्रिलपर्यंत बंदोबस्त राहणार आहे.
श्रीक्षेत्र जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेला महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथून लाखो भाविक वाडीरत्नागिरी येथे येतात. सुमारे 4 ते 5 लाख भाविक यात्रेदरम्यान डोंगरावर दाखल होतात. भाविकांची संख्या लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने जोतिबा डोंगरावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सोमवारी (दि.30) सकाळी बंदोबस्ताचे वाटप केले जाईल. बुधवारी (दि.1) यात्रा संपेपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे. यात्रेसाठी जिल्ह्यातील 885 पोलिस अधिकारी, कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तर परिक्षेत्रातून 436 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
बॉम्बशोध पथक, सीसीटीव्हीची नजर
चैत्र यात्रेवर बॉम्बशोध पथक व सीसीटीव्हींचा वॉच राहणार आहे. दोन बॉम्ब शोध व नाशक पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येक तीन ते चार तासांनी परिसराची व पार्किंगच्या ठिकाणाची तपासणी केली जाईल. याचसोबत देवस्थान समितीने 100 हून अधिक सीसीटीव्ही बसविले आहेत.