कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा सोमवार (दि. 30) ते बुधवार (दि. 1 एप्रिल) या काळात होत आहे. महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्रा काळात वाहतुकीत होणारे अडथळे दूर करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह स्थानिक पोलिस यंत्रणेने व्यापक नियोजन केले आहे. 33 ठिकाणी वाहतूक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी 400 पोलिस, 400 होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी शुक्रवारी पत्रकारांना माहिती दिली. भाविकांच्या वाहनासाठी 33 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने नवीन एस.टी. स्टँडमागे, तोरणाई कडा, पिराचा कडा, एमटीडीसी परिसर,जुने एस.टी. स्टँडसमोर, सेंट्रल फ्लाझा, ग्रामपंचायत, मेन पार्किंग, यमाई वळणावर, यमाई मंदिर डावी बाजू, यमाई मंदिरामागे (दुचाकी), तळ्याजवळ (दुचाकी), बुने फार्म हाऊसमागे (दुचाकी), हॉटेल श्रावणीमागे, उजवी बाजू, मातोश्री लॉज, यमाई पायरी, निलगिरी बाग, लादे मळा, तीव— वळण पडकी इमारत, दानेवाडी फाटा, दानेवाडी क्रॉसिंग नवीन आंब्याचे झाड, जुने आंब्याचे झाड, शेवताई या ठिकाणांचा पार्किंग सुविधेमध्ये समावेश आहे.
सोमवारी 30 मार्चला रात्री आठ वाजेपर्यंत मालाने भरलेले ट्रक, अवजड वाहने, तीनचाकी प्रवासी व माल वाहतूक, रिक्षांसह ट्रॅक्टर जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी केर्ली, कुशिरे, वाघबीळ, गिरोली या ठिकाणाहून पुढे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. एक एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पहाटे 5 पासून दुचाकी वाहनांना जोतिबा डोंगरावर दानेवाडी क्रासिंग, जुने आंब्याचे झाड, गिरोली फाटा याठिकाणाहून प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्याचेही मोरे यांनी सांगितले.