कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये वाहन चालक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून जिल्हा व सत्र न्यायालयातील शिपाई अमर बळवंत सुतार (रा. राजोपाध्येनगर ) याने एका तरुणाची 8 लाख 54 हजार 200 रुपयांची फसवणूक केली. त्याने दिलेल्या बनावट नियुक्तीपत्राचा प्रकार सोमवारी उघडकीला आला.
विजय शिवाजी ज्वारे (वय 47, रा. राजोपाध्येनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी सुतार याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयात शिपाई पदावर काम करणारा अमर सुतार आणि विजय ज्वारे यांची ओळख होती. तीन महिन्यांपूर्वी संशयिताने ज्वारे यांच्या मुलाला सर्किट बेंचमध्ये वाहन चालक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी साडेतीन लाखांची मागणी केली. त्यानुसार त्याने साडेतीन लाख रोख घेतले. त्यानंतर काही दिवसांनी स्वत:च्या आर्थिक अडचणींचे कारण सांगून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने 5 लाख रुपये घेतले.
नोव्हेंबरमध्ये त्याने ज्वारे यांच्या मुलाच्या नावे बनावट नियुक्तीपत्र दिले. त्यावर 22 डिसेंबर रोजी सर्किट बेंचमध्ये हजर राहण्याचा आदेश दिला होता. तसेच जिल्हा न्यायालयाचा शिक्का होता. नियुक्तीपत्रानुसार ज्वारे यांचा मुलगा सोमवारी सकाळी सर्किट बेंचमध्ये हजर होण्यासाठी गेला असता पत्र पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांना शंका आली.
नियुक्ती पत्रावर जिल्हा न्यायालयाचा शिक्का असल्याने अधिकाऱ्यांनी ज्वारे यांना जिल्हा न्यायालयात पाठवले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी घटनेची गंभीर दखल घेतली. तातडीने गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी पुढील कार्यवाही केली.