Job fraud scam | नोकरीच्या आमिषाने महिलेची साडेचार लाखांची फसवणूक file photo
कोल्हापूर

Job fraud scam | नोकरीच्या आमिषाने महिलेची साडेचार लाखांची फसवणूक

कोडोलीतील एकास अटक

पुढारी वृत्तसेवा

कोडोली : शासकीय भूमी अभिलेख विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी लावतो, असे सांगून एका महिलेची 4 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोडोली (ता. पन्हाळा) येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोडोली पोलिसांनी चंद्रकांत यादव महापुरे (वय 55, रा. कोडोली) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कोडोली येथील माधुरी आनंदराव आपटे (वय 37) यांचा विश्वास संपादन करून महापुरे याने त्यांना भूमी अभिलेख विभागात सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने वेळोवेळी रोख रक्कम, आरटीजीएस आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण 4 लाख 50 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यावर महापुरे याने आपटे यांना चक्क संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्या स्वाक्षरीचे बनावट नियुक्ती पत्र दिले.

मिळालेले नियुक्ती पत्र घेऊन माधुरी आपटे हातकणंगले येथील तहसीलदार कार्यालयात नोकरीवर रुजू होण्यासाठी गेल्या. मात्र, तिथे अधिकार्‍यांनी त्यांना कामावर घेण्यास विरोध केला. जेव्हा आपटे यांनी नियुक्ती पत्र दाखवले, तेव्हा ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आपटे यांनी महापुरे याच्याकडे पैशांचा तगादा लावला. त्याने 1 लाख 60 हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित 2 लाख 90 हजार रुपये देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, तर पोलिसांत तक्रार केली किंवा पैसे मागितले, तर तुम्ही माझ्याकडून 15 टक्के व्याजाने पैसे मागता, अशी उलट तक्रार तुमच्यावरच दाखल करीन, अशी धमकीही त्याने दिली. अखेर आपटे यांनी कोडोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलिस अंमलदार महेश कीर्तीवर्धन करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT