कोल्हापूर : इम्तियाज खाटिक यांच्या घरातील चोरीनंतर घटनास्थळी फॉरेन्सिक, श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

kolhapur | जियारत विधीसाठी जमले पाहुणे; कपाटातून लांबवले 16 तोळे दागिने

लक्ष्मीपुरीतील घोंगडी ओळ येथील घटना; फिर्यादीसह पोलिसही चक्रावले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील मध्यवर्ती घोंगडी ओळ परिसरात वृद्धेच्या जियारत विधीसाठी नातेवाईकांसह पाहुण्यांची गर्दी झालेली असतानाच घरातून 24 लाख रुपये किमतीच्या 16 तोळे दागिन्यांची चोरी झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीला आला. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.

इम्तियाज अब्दुलमजिद खाटीक (वय 48, रा. घोंगडी ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर) यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. कुटुंबासह ते चार मजली इमारतीत राहतात. मंगळवारी त्यांच्या वृद्ध आईचे निधन झाले. रात्री उशिरा व बुधवारी सकाळपासून जिरायत विधीसाठी नातेवाईक, पाहुण्यांची गर्दी होती.

बुधवारी सकाळी खाटिक यांची मुलगी चौथ्या मजल्यावरील खोलीत गेली. त्यावेळी तिला खोलीतील कपाटातील साहित्य विस्कटल्याचे व ड्रॉव्हरमधील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. मुलीने हा प्रकार आई, वडिलांना सांगितला. आईने कपाटाची पाहणी केल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

लक्ष्मीपुरी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर, सहायक पोलिस निरीक्षक खंडू गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसेतज्ज्ञांसह फॉरेन्सिक पथक, श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वान परिसरातच घुटमळले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे सहायक निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT