Amit Shah 
कोल्हापूर

Amit Shah : घुसखोरांना वेचून वेचून मारू

गृहमंत्री अमित शहा : घुसखोरांच्या मतांसाठी उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : काँग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे हे घुसखोरांना व्होट बँक बनवून जगत आहेत. मात्र त्यांनी कान उघडून ऐकावे, हा देश धर्मशाळा नाही. येथे जन्म घेतलेल्या व्यक्तीच भारतात राहू शकतात. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घुसखोरांना केंद्र सरकार वेचून वेचून मारेल. कोणालाही त्यांचा व्होट बँक म्हणून वापर करू देणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जाहीर सभेत दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते.

महायुती राज्य शासनाने श्री अंबाबाई मंदिरातील विविध विकासकामांसाठी १५०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस परेड ग्राऊंडवर केंद्रीय गृहमंत्री शहा यांची कृतज्ञता सोहळा आणि जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक वारशाला नवसंजीवनी देण्याचा संकल्प व्यक्त केला.

कोल्हापुरात चांगल्या कामासाठी आम्ही एकत्रित आल्याचे सांगून गृहमंत्री शहा म्हणाले, औरंगजेबने तोडलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण होत आहे. सोमनाथ मंदिर पुन्हा सुवर्ण मंदिर होईल. केदारनाथ, बद्रीनाथ, कामाख्या मंदिर कॉरिडॉरनंतर आता अंबाबाई मंदिर कॉरिडॉर होत आहे. महाराष्ट्रात सर्व शक्तिपीठांचे पुनर्निर्माण होत आहे ही गौरवाची बाब आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अशक्य समजले जाणारी सर्व कामे होत असल्याचे सांगून गृहमंत्री शहा म्हणाले, आपल्या आयुष्यात अयोध्येत राम मंदिर होईल की नाही असे वाटत होते. परंतु प्रभू रामानेच २०१४ मध्ये भाजपचे सरकार आणले. पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाल्यानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माण झाले. स्वतंत्र भारताचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मोदी यांच्या कालावधीतील १२ वर्षे म्हणजे देशाच्या विकासाचा सुवर्णकाळ म्हणून नोंदवला जाईल.

अनेकजण बंगालमध्ये काय होणार अशी विचारणा करत होते, असे सांगून गृहमंत्री शहा म्हणाले, बंगालमधील जनतेने भाजपला निवडून दिले आहे. बंगालसह देशातील जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. बंगालच्या जनतेचे ऋण पंतप्रधान मोदी आणि भाजप कधीही विसरणार नाही. कोल्हापूरच्या या पवित्र भूमीतून मी तुम्हाला विश्वास देतो की, केवळ बंगालच्या सीमेवर घुसखोरांना नाही तर देशातून एकेक घुसखोरांना वेचून वेचून मारू. मतासांठी घुसखोरांना पाठबळ देणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर उद्धव ठाकरे जाऊन बसले आहेत.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मंत्री जयकुमार गोरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार उपस्थित होते. दरम्यान, खा. धनंजय महाडिक यांनी गृहमंत्री शहा यांना श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन, मंत्री मुश्रीफ यांनी श्रीरामाची प्रतिमा देऊन, आ. क्षीरसागर यांनी तलवार देऊन तर आ. विनय कोरे यांनी श्री जोतिबाची प्रतिमा देऊन, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देऊन सत्कार केला.

‘राम... राम... प्रणाम...’

गृहमंत्री शहा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘राम... राम... प्रणाम...’ अशा शब्दांत केली. त्यानंतर ‘भारत माता की जय’चा नारा देत त्यांनी सभेतील वातावरण भारावून टाकले. कोल्हापुरातील जनतेचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी खास शैलीत संवाद साधला. कोल्हापुरातील जनतेचा आवाज कमी आहे. आवाजात दम नाही, हे काही बरोबर नाही. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरला एवढा मोठा निधी दिला आहे, जरा आवाज वाढवा, असे आवाहन त्यांनी करताच सभेत घोषणांचा कडकडाट झाला.

मोदी यांच्यामुळे भारत सुरक्षित...

नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम केला असल्याचे सांगून गृहमंत्री शहा म्हणाले, मोदी यांच्यामुळेच संस्कृती टिकून आहे. भारत सुरक्षित आहे. जगभरात भारताचा सन्मान केला जातो. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ ते गंगासागरपर्यंत देशात भाजपचे शासन आहे. मोदी यांच्या कालावधीत प्रत्येक क्षेत्रात देश प्रगतीपथावर आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख

गृहमंत्री शहा यांनी व्यासपीठावरील उपस्थितांची नावे घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख थेट शिवसेनाप्रमुख असा केला. यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी शिंदे गट असा उल्लेख केला जात होता. परंतु आता कोणतीही फूट उरलेली नाही. एकच शिवसेना आहे आणि ती पूर्णपणे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे, असे सांगत शहा यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाला खुला पाठिंबा दिला, असे सांगत पुन्हा सहा खासदार फुटलेल्या ठाकरे सेनेला डिवचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT