हुपरी : पट्टण कोडोलीचे ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेसाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकाचे पिशवीत ठेवलेले ८ लाख ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात लंपास केल्याची घटना घडली आहे. सराफ व्यावसायिक सातिंदर आश्रुबा मैंद (वय ६४, रा. किल्लेधारू, जि. बीड) यांनी याबाबतची फिर्याद हुपरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
सराफ मैंद हे विठ्ठल बिरदेव यात्रेसाठी सहकुटुंब आले आहेत. गुरुवारी दुपारी फरांडेबाबांच्या भाकणुकीवेळी ते फरांडेबाबा बसणाऱ्या दगडी गादीजवळील रिकाम्या जागेत राहिले होते. यात्रेतील गर्दीमध्ये मुलांच्या व महिलांच्या अंगावरील दागिने चोरीस जाण्याचा धोका असल्याने अंगावरील सर्व सोन्याचे दागिने पिशवीत ठेवले होते. त्यामध्ये साडेपाच लाख रुपये किमतीच्या ५४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चेन, साडेतीन लाख रुपये किंमतीच्या ३५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पैलू पाटल्या असे मिळून ८ लाख ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता.
यात्रेतील गर्दीचा चोरट्याने सराफ सातिंदर मैंद यांची सोन्याचे दागिने असलेली ही पिशवी हातोहात लांबविली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची फिर्याद हुपरी पोलिसांत दिली.