Sangli Kolhapur Highway Accident
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गावर चिपरी गावच्या हद्दीत झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुचाकीस्वार शेखर प्रभाकर गायकवाड (वय २३, रा. नांदणी रोड, संभाजीनगर, जयसिंगपूर) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री घडला.
या अपघातप्रकरणी कार चालक रोहित बाळू गुळींग (रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) याच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत शेखर गायकवाड हा त्याच्या मित्राची डियो दुचाकी घेऊन कोल्हापूरकडून जयसिंगपूरच्या दिशेने येत होता. याचवेळी कोल्हापूरच्याच दिशेने जाणाऱ्या कार चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत बेजबाबदारपणे कार चालवली.
त्यामुळे भरधाव कारने शेखरच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात शेखरचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची वर्दी योगेश प्रभाकर गायकवाड यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.