कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर परिसरात जवळपास पंधरा-वीस वर्षांपासून बेकायदेशीर स्टोन क्रशर आपल्या धुळीने संपूर्ण परिसरातील पर्यावरणाचे प्रदूषण करीत आहेत. असे असताना ही बाब जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण विभागाने कशी काय दुर्लक्षित केली? की त्यांच्याही डोळ्यात या क्रशर चालकांनी ‘अर्थपूर्ण धूळफेक’ केली होती, असा सवाल या भागातील नागरिक करीत आहेत.
एकदाही नाही नोटीस : या भागातून जाणारे रस्ते या क्रशरच्या धुळीने माखून ठेवलेलेच आहेत; पण नागरी वस्त्या आणि पिकेही या धुळीच्या कचाट्यात सापडली आहेत. अनेक वर्षांपासून गगनाला भिडणारे धुळीचे लोट प्रदूषण नियंत्रण विभागाला कसे दिसले नाही? कारण आजपर्यंत या विभागाच्या वतीने या क्रशरना कधी नोटीस बजावल्याचे माहीत नाही.
तहसीलदारांचा कांगावा : दै. ‘पुढारी’मधून या बेकायदेशीर प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर शिरोळचे तहसीलदार अनिल हेळकर हे सांगत सुटले आहेत की, या क्रशरचा वीज पुरवठा खंडीत केला आहे, क्रशर सील केले आहेत. पण ही कारवाई पूर्वीच का झाली नाही? शासनाच्या गौण खनिजाची लूट केल्याबद्दल हे क्रशर जप्त करून संबंधित चालक-मालकांना दंड का ठोठावला नाही? संबंधितांवर गुन्हे का दाखल केले नाहीत? असे अनेक सवाल आता उपस्थित होणार आहेत. यापूर्वी नागरिकांनी कित्येक तक्रारी केल्या आहेत. पण या तक्रारींना तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने केराच्या टोपल्या दाखविल्या आहेत.
तासाभरात सगळे गायब!
दै. ‘पुढारी’ने क्रशरच्या अवैध धंद्याला वाचा फाडल्यानंतर अगदी तासाभरात या क्रशरवर काम करणारे कामगार, वाहतूक करणारे ट्रॅक्टर्स, डंपर्स तिथून गायब झाले आहेत. क्रशरचे चालक आणि मालकही मागील दोन दिवसांपासून तिकडे फिरकलेले नाहीत. हे क्रशर आता कायमस्वरूपी बंद व्हावेत, अशी या भागातील लोकांची मागणी आहे.
पिकांची नुकसानभरपाई कोण देणार?
गेल्या अनेक वर्षांपासून या क्रशरच्या धुळीमुळे या भागातील शेतीची पार धूळधाण उडालेली आहे. पिकांची वाढ खुंटलेली आहे, भाजीपाल्यासारखी पिके करपून गेली आहेत, तर फळपिके कुजून गेली आहेत. यामुळे या भागातील शेतीचे करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे. या सगळ्या नुकसानीला जबाबदार कोण? शासनाने हे संबंधित क्रशर चालक आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून वसूल करावे, अशी मागणी होत आहे.