हसन मुश्रीफ  Pudhari FIle Photo
कोल्हापूर

जयंत पाटील म्हणाले, साहेब... माझं मन लागत नाही; मुश्रीफांनी सांगितला किस्सा

Hasan Mushrif | योग्य वेळी लाडक्या बहिणींना २१०० रुपये आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू

पुढारी वृत्तसेवा, Kavitha R

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. बुधवारी जयंत पाटील यांनी 'माझी गॅरंटी घेऊ नका, माझे काही खरे नाही' असे विधान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यातच आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही जयंत पाटील यांनी एकदा आपल्याजवळ 'मन कशात लागत नाही,' असं बोलून दाखवलं होतं, असा दावा करत एक किस्सा सांगितला.

गुरूवारी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जयंत पाटील नाराज आहेत हे नक्की; मला नागपूरला एकदा बोलून दाखवलं होतं की, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही. सत्तेत नसताना पाच वर्ष पक्ष टिकवणे हे फार अवघड आहे, याची त्यांना कल्पना आली असावी. त्यांचं मन परिवर्तन होणार का? हे आता त्यांनाच विचारावं लागेल, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. महिलांना एचपीव्ही लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही लस ९ वर्षापासून २६ वर्षांपर्यंतच्या महिलांना दिली जाते. लस सुरक्षित असून कोल्हापूर जिल्ह्यात एकूण अडीच लाखांवर मुली आणि महिलांना ही लस देण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर मी शेतकऱ्यांबरोबर

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, लक्षवेधी प्रश्नांसाठी पैसे दिल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनीच केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये लक्ष घालतील. या वेळचे बजेट सादर करणे ही तारेवरची कसरत होती. उपमुख्यमंत्र्यांनी कौशल्याने तारेवरची कसरत पार केली असल्याचे ते म्हणाले. शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, मी शेतकऱ्यांबरोबर आहे. मात्र शेतकरीच बदलणार असतील तर माझा नाईलाज आहे. शक्तिपीठ महामार्गाबाबत निवडणुकीपूर्वी तुम्ही काय घेतलं? काय नाही? हे संजय राऊत यांना माहिती असेल, तर त्यांनी पुराव्यानिशी सादर कराव. अचानकपणे काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येत आहेत. काय करायचं ते आता शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

योग्य वेळी कर्जमाफी करू

धनंजय मुंडे यांचे रिकामं झालेलं खातं अजित पवार यांच्याकडेच आहे. मुंडे निर्दोष झाले तर पुन्हा ते खाते त्यांना द्यावे लागेल. अजित पवार यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मी नितेश राणे यांना भेटून याबाबत कल्पना देणार आहे. ते माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांना भेटून चर्चा करणार आहे. त्यांनी जे म्हटलं त्याला मल्हार सेनेने विरोध केल्याचे मश्रीफ यांनी सांगितले. लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही. जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो. आम्ही योग्य वेळी २१०० रुपये देऊ आणि योग्य वेळी कर्जमाफी करू, याची चिंता कोणी करू नये.

फक्त इस्टेट सांभाळणं काम नाही; मुश्रीफांचा टोला

मुश्रीफ यांनी यावेळी समरजितसिंह घाटगे यांच्यावरही निशाणा साधला. शाहू हॉल १०० ते १५० वर्षांपासून नगरपालिकेच्या ताब्यात आहे. विक्रम सिंह राजे यांनी देखील या ठिकाणी कार्यक्रम घेतले होते. त्यांच्या पूर्वजांनी जागा दिली होती, ती आता परत द्या असं म्हणणं कितपत उचित आहे. मी त्यांना विकास यात्रेत सहभागी होण्याची विनंती केली होती. राजकारणात, समाजकारणात आला असेल तर समाजितसिह यांनी हे बघणं देखील गरजेचे आहे. फक्त आपली इस्टेट सांभाळणं काम नाही. ठीक झालं, छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनी काढून घेतल्या नाहीत. ते शाहू महाराज कुठे आणि हे कुठे? त्यांनी मान्य नाही केलं, तर जनता रस्त्यावर उतरेल, असे मुश्रीफ म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT