Nipah virus Japan vaccine trials | निपाह विषाणूच्या मुसक्या बांधण्यासाठी जपानी लसीच्या चाचण्या सुरू! 
कोल्हापूर

Nipah virus Japan vaccine trials | निपाह विषाणूच्या मुसक्या बांधण्यासाठी जपानी लसीच्या चाचण्या सुरू!

टोकियो विद्यापीठातील संशोधकांना लसनिर्मितीत यश; एप्रिलमध्ये बेल्जियममध्ये सुरू होणार क्लिनिकल चाचणी!

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : कोणत्याही प्रभावी उपचार पद्धतीच्या उपलब्धतेच्या अभावामुळे जगातील आरोग्य सेवेपुढे आव्हान ठरलेल्या निपाह विषाणूच्या मुसक्या बांधण्याच्या प्रयत्नाला सुरुवात होते आहे. जपानमधील टोकियो विद्यापीठातील संशोधकांनी या जीवघेण्या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी एक नवी लस संशोधित केली आहे. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ होतो आहे. प्राथमिक अवस्थेत चांगला परिणाम दाखविणार्‍या या लसीचे क्लिनिकल चाचण्यांमध्ये सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत. तिची यशस्विता आरोग्य विज्ञानापुढे निर्माण झालेल्या एका मोठ्या संकटाचा मुकाबला करू शकते.

भारतात गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूची दोन प्रकरणे नोंदविली गेली होती. यापूर्वी दक्षिणेत केरळ व तामिळनाडू येथेही अशा प्रकारचे काही संशयित रुग्ण आढळून आले होते. या विषाणूचा परिणामकारक मुकाबला करणारी कोणतीही उपचार पद्धती वा लस उपलब्ध नाही. यामुळे मृत्यूच्या दाढेत जाण्याव्यतिरिक्त रुग्णापुढे पर्याय नाही. साहजिकच, या संसर्गजन्य रोगाच्या रुग्ण आढळाच्या पार्श्वभूमीवर भारतात चिंता निर्माण झाली होती. जगभरातील काही देशांमध्ये भारतातून येणार्‍या विमानांवर काही प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची चर्चाही सुरू होती. तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने त्याची पूर्ण दखल घेतली, परिस्थितीचे अवलोकन केले आणि भारतातील साथीचे स्वरूप पाहता कोणत्याही हवाई प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज नसल्याचा निर्वाळा दिला होता. या पार्श्वभूमीवर जपानची निपाहविरोधी लस संशोधकांनी सज्ज केली आहे.

‘रिपॉम्बिनंट व्हायरल व्हेक्टर’ या तंत्रज्ञानावर आधारित ही लस निर्माण करण्यात आली आहे. ती निर्माण करताना संशोधकांनी निपाह विषाणूच्या आनुवंशिक पदार्थाचा एक भाग कमकुवत केलेल्या गोवर (मिझल्स) विषाणूमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. जागतिक लसीकरण कार्यक्रमांमध्ये गोवर विषाणूवर आधारित व्यासपीठ यापूर्वीपासून वापरण्यात येते आहे. ही लस मानवाला दिल्यानंतर त्याच्या शरीरात निपाह विषाणूसारखी प्रथिनांची प्रतिपिंडे (अँटिजेन प्रोटिन) तयार होतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला प्रत्यक्ष विषाणू ओळखण्याचे प्रशिक्षण मिळते. यामुळे संसर्ग टाळता येतो अथवा आजाराची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते. टोकियो विद्यापीठाच्या संशोधकांच्या पथकाने या लसीच्या प्राण्यांवर घेतलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. विशेषतः, हॅम्स्टरवर (मोठ्या घुशीसारखा दिसणारा कुरतडणारा प्राणी) केलेल्या चाचण्यांमध्ये लसीची सुरक्षितता आणि संरक्षणात्मक रोगप्रतिकारक प्रतिसाद दिसून आल्याचे या विद्यापीठाच्या संशोधन अहवाल नमूद करण्यात आले आहे.

मृत्यू दर 40 ते 75 टक्क्यांवर

वटवाघळाच्या लाळ किंवा मूत्राने दूषित अन्नाचे सेवन, संक्रमित प्राण्याचा जवळचा संबंध किंवा संक्रमित व्यक्तीच्या शारीरिक द्रवांद्वारे या साथीचा मानव ते मानव असा प्रवास होऊ शकतो. ताप, डोकेदुखी अशी प्रारंभिक लक्षणे असणार्‍या या साथीत पुढे तीव्र श्वसन त्रास किंवा मेंदुज्वरासारखी धोकादायक मेंदूची सूज उद्भवू शकते. या संसर्गाचा मृत्यू दर 40 ते 75 टक्क्यांवर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT