MLA Satej Patil | जनसुराज्य व अजित पवार राष्ट्रवादी भाजपची ‘बी टीम’  Pudhari File Photo
कोल्हापूर

MLA Satej Patil | जनसुराज्य व अजित पवार राष्ट्रवादी भाजपची ‘बी टीम’

आ. सतेज पाटील; महायुती विरुद्ध कोल्हापूरकर अशीच निवडणूक होणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ही थेट ‘महायुती विरुद्ध कोल्हापूरकर’ अशीच होणार असल्याचा ठाम दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी त्यांनी जनसुराज्य शक्ती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे पक्ष भाजपचीच ‘बी टीम’ असल्याचा आरोप करत विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, कोल्हापूरकरांच्या हिताचे प्रश्न बाजूला ठेवून केवळ सत्तेसाठी महायुतीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूरकर ही निवडणूक विकास आणि स्वाभिमानाच्या मुद्द्यावर महायुतीच्या विरोधात लढवतील.

रंकाळा सुशोभीकरणातील अनियमिततेचे ऑडिट करा

रंकाळा तलावावर उभारण्यात आलेल्या कारंजांसाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा करत आमदार पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. याच प्रकारचे कारंजे कागलमध्ये अवघ्या 55 लाख रुपयांत उभारले गेले. मग, रंकाळ्यावर एवढा खर्च कशासाठी? या सुशोभीकरणातील अनियमिततेचे ऑडिट मंत्री हसन मुश्रीफ यांनीच करावे, असा टोला त्यांनी लगावला.

खासदारांनी तारतम्य बाळगावे

राज्यसभेतील खासदारांच्या वक्तव्यांवर आ. पाटील म्हणाले, थोडं तरी तारतम्य बाळगायला हवं. कोल्हापूरकर जर त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मतदान करत असते, तर त्यांचा दोन लाख 70 हजार मतांनी पराभव झाला नसता.

भूतकाळ विसरून टीका करू नका

आमच्यावर टीका करण्याआधी त्यांनी 2005 चा इतिहास पाहावा. ताराराणी आघाडीच्या माध्यमातून तेही महापालिकेच्या सत्तेत होते. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचा महापौर, शिवसेना व परिवहन सभापतिपद हे सगळे घटक सोबत होते, याची आठवण करून देत आ. पाटील यांनी आ. राजेश क्षीरसागर यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला.

प्रशासकांवर कंट्रोलचा दावा; मग बोगस कामांची जबाबदारी घ्या

पालकमंत्री म्हणतात की, महापालिकेच्या प्रशासकांवर आमचा कंट्रोल आहे. मग, गेल्या तीन वर्षांत कोल्हापूरमध्ये झालेल्या बोगस कामांची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली पाहिजे, असा घणाघात आमदार पाटील यांनी केला.

‘राहुल आवाडे अभी तो बच्चा हैं’

इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आ. पाटील म्हणाले, राहुल आवाडे अभी तो बच्चा हैं. गेल्या दीड वर्षात पाणी प्रश्न का सुटला नाही, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT