चंदगड : चुलत बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. हर्षद प्रकाश हुंदळेकर (वय १७, रा. जंगमहट्टी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चंदगड पोलिसांनी मुख्य संशयितासह तिघांना अटक केली आहे.
दरम्यान, हर्षदचा मृतदेह तिलारी येथील स्वप्नवेल पर्यटनस्थळाजवळील दरीत टाकल्याचा संशय असून, पोलिस आणि विविध खासगी रेस्क्यू टीमकडून दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत मृतदेह सापडला नाही. या प्रकरणी किर्तीकुमार रामू कुट्रे (वय २८), दिलीप ऊर्फ लहू लक्ष्मण कुट्रे (वय २९) आणि श्रीनाथ मधुकर नागुर्डेकर (वय २४, तिघेही रा. जंगमहट्टी) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदचे किर्तीकुमारच्या चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधाचा राग मनात धरून किर्तीकुमारने हर्षदला हेरण्यासाठी सुमारे आठवडाभरापूर्वी इन्स्टाग्रामवर ‘कमल खरात’ या नावाने बनावट खाते तयार केले. या खात्यावरून त्याने हर्षदशी चॅटिंग सुरू केले.
शनिवारी रात्री याच बनावट खात्याच्या माध्यमातून हर्षदला पार्ले येथे बोलावून घेण्यात आले. हर्षद पाटणे फाट्यावरून किट आणतो, असे सांगून एका मित्रासोबत पार्ले येथे गेला होता. तेथे पोहोचल्यानंतर त्याला ‘तू एकटाच ये’ असा संदेश मिळाला. त्यामुळे त्याने मित्राला तेथेच थांबवून पुढे गेला. त्यानंतर किर्तीकुमार आणि त्याच्या साथीदारांनी हर्षदला जबर मारहाण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने हर्षद जागीच कोसळला. त्यानंतर रात्री उशिरा त्याचा मृतदेह चारचाकी वाहनातून तिलारी येथील स्वप्नवेल पर्यटनस्थळाजवळील खोल दरीत टाकण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, हर्षदची दुचाकी बेळगाव येथे पोलिसांना आढळून आली. या दुचाकीच्या आधारेही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी तिन्ही संशयितांना बुधवारी घटनास्थळी नेऊन पाहणी केली.
पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील आणि पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी बुधवारी ड्रोन, फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि श्वानपथकाच्या मदतीने मोहीम राबविण्यात आली. मात्र, तिलारी परिसरात दाट धुके आणि अंधुक प्रकाशामुळे शोधकार्यात अडथळे आले. त्यामुळे मृतदेहाचा ठावठिकाणा लागला नाही.
गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार असून, सावंतवाडी येथील बाबुलाल अल्मेडा रेस्क्यू टीमही या मोहिमेत सहभागी होणार आहे. या घटनेमुळे चंदगड तालुक्यासह सीमाभागात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पोवार करीत आहेत.