जयसिंगपूर: येथील नगरपालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजश्री शाहू विकास आघाडीने विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आमदार यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील-यड्रावकर यांनी ११ हजार १७९ मतांची मोठी आघाडी घेत ऐतिहासिक विजय संपादन केला. या विजयामुळे जयसिंगपूर पालिकेवर पुन्हा एकदा यड्रावकर गटाचा झेंडा फडकला असून, विरोधकांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे.
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत संजय पाटील-यड्रावकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली होती. केवळ नगराध्यक्षपदच नव्हे, तर नगरसेवक पदाच्या तब्बल २० जागांवर राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरीकडे भाजप, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची मिळून बनलेली 'जयसिंगपूर विकास आघाडी' केवळ ५ जागांवरच समाधान मानावे लागले. या निवडणुकीत एका अपक्ष उमेदवारानेही बाजी मारली आहे.
आमदार यड्रावकरांना रोखण्यासाठी जयसिंगपुरात सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले होते. मात्र, शहराच्या विकासकामांच्या जोरावर आणि आमदार यड्रावकरांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास दर्शवला आहे. निकाल जाहीर होताच यड्रावकर समर्थकांनी गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.