कोल्हापूर : ‘धर्मस्थळांचा अपमान, नाही सहन करणार’, ‘जैन समाजावर अन्याय करणार्यांचा धिक्कार असो’ असा आक्रोश करत मुंबई महापालिकेने जैन मंदिर पाडले, त्यांनीच ते आहे तिथेच बांधून द्यावे, अक्षय तृतीयेपर्यंत त्याची घोषणा करा, अशी मागणी सकल जैन समाजाने केली. या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
दसरा चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. विलेपार्ले येथे 32 वर्षांपासून भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. मंदिर रस्त्यात नाही, त्यामुळे कोणताही सार्वजनिक अडथळा निर्माण होत नाही, तरीही मंदिर जेसीबीने पूर्णपणे उद्ध्वस्त केले. मंदिरातील मूर्तीही दुसरीकडे नेण्यास सांगितले नाही. जैन समाजाविरुद्ध हा कट असल्याचा आरोप केला. मंदिर उद्ध्वस्त करणार्या अधिकार्याला तातडहीने निलंबित करा. जैन मंदिराचे पुनर्निर्माण करा. यासह राज्यातील जैन तीर्थक्षेत्रे, जैन मंदिरे, जैन साधू व साध्वी, श्रावक व श्राविका यांच्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करा. जैन धार्मिक अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये घटनेनुसार असलेल्या नोकर भरतीच्या अधिकारातील बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवा, अशा मागण्याही या निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. माजी आमदार प्रकाश आवाडे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील आणि जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी भावना व्यक्त केल्या. आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. राहुल आवाडे, आ. अमल महाडिक, डॉ. अजित पाटील, संजय शेटे, अरविंद मजलेकर, सुरेश रोटे, राजेश लाटकर, राहुल चव्हाण, धनंजय दुग्गे, जसवंत शहा, जितुभाई शहा, रमेश राठोड, महावीर शेटे, डॉ. महावीर मिठारी आदींसह सर्व जैन मंदिराचे अध्यक्ष आणि विश्वस्त मोर्चात सहभागी झाले होते.
‘लढून जिंकणार आणि मंदिर तेथेच बांधणार’, ‘आम्ही कमी आहोत पण घाबरट नाही’, ‘आमच्या श्रद्धेचा अपमान, नाही सहन करणार’ अशा आशयाचे फलक घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते.