कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीमुळे साखर हंगाम एक महिना लांबल्याने गूळ हंगाम तेजीत सुरू आहे. सध्या गुळाला 3600 ते 4200 प्रतिक्विंटल दर आहे. विशेष म्हणजे गुळाच्या विक्रीचे पैसे एकरकमी मिळत आहेत. तसेच कारखान्यांपेक्षा दर चांगला मिळत आहे. यामुळे गूळ उत्पादनात वाढ झाली आहे. यामुळे बाजार समितीत गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जादा गूळ रव्यांची आवक होत आहे. सध्या सुमारे 10 लाखांपर्यंत गूळ रव्यांची आवक झाली आहे.
यापूर्वी गूळ आणि साखर हंगाम एकाच आठवड्यात सुरू होत असे. त्यात साखर कारखाने उसाचे दर जाहीर करत असत. तो दर गुळाला मिळणार्या दरापेक्षा जास्त असे. त्यामुळे शेतकरी गुर्हाळघरे बंद करून आपला ऊस कारखान्याला पाठवत असत. या वर्षी परिस्थिती बदली आहे. विधानसभा निवडणूक आणि दिवाळी सण यामुळे साखर हंगाम एक महिना पुढे गेला. पावसाने संधी दिल्याने गुर्हाळघरे अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. सध्या गुळाला मिळणारा चांगला दर यामुळे तीन ते चार वर्षे बंद असलेली गुर्हाळघरे पुन्हा सुरू होऊ लागली आहेत. सध्या जिल्ह्यात 75 ते 80 गुर्हाळे सुरू झाली आहेत. एकूण 100 ते 120 गुर्हाळे सुरू होतील.
यापूर्वी गुळाचा हंगाम सुरू झाला की, सौदे बंद पाडण्याचे प्रकार घडत होते. या वर्षी हंगामाच्या दुसर्या आठवड्यात सौदे बंद झाले; पण दुसर्याच दिवशी ते सुरू झाले. त्यामुळे दरावर फारसा परिणाम झाला नाही, उलट 200 रुपये जादा दर मिळाला. यामुळे शेतकर्यांमधून समाधानाचे वातावरण आहे. यापुढे गुळाचा हंगाम चांगल्या पद्धतीने आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत शेतकर्यांमधून व्यक्त केले जात आहे.
बाजार समितीत दररोज 50 ने 60 हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. दहा हजारांवर गुळाच्या बॉक्सची आवक होत आहे. या गुळाला चांगला दर मिळत आहे. यामुळे कोल्हापूरसह सीमाभागातील काही गावांतूनही गुळाची आवक होत आहे.