कोल्हापूर बाजार समिती Pudhari File Photo
कोल्हापूर

Agricultural Produce Market Committee | ‘अन्‍न औषध’ची धास्‍ती; जिल्ह्यातील गूळ उत्‍पादन बंद

गूळ उत्‍पादक शेतकर्‍यांचा निर्णय; बाजार समितीत सौदे बंद राहण्‍याची शक्‍यता

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : अन्‍न व औषध प्रशासन विभागाकडून राज्‍यातील गुर्‍हाळ घरांवर धाडी टाकत सुरू असलेल्‍या कारवाईचा धसका जिल्‍ह्यातील गूळ उत्‍पादकांनी घेतला आहे. सोमवारपासून (दि.८) गूळ उत्‍पादन बंद करण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याची माहिती काही गूळ उत्‍पादक शेतकर्‍यांनी कोल्‍हापूर शेती उत्‍पन्‍न बाजार समितीमधील काही गूळ व्‍यापार्‍यांना दिली आहे. त्‍यानुसार आजपासून समितीमधील गूळ सौदे बंद राहण्‍याची शक्‍यता आहे.

अन्‍न व औषध प्रशासन विभागाच्‍या आयुक्‍तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्‍ती झाल्‍यानंतर त्‍यांनी राज्‍यभर भेसळखोरां विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. गुळामध्‍ये साखर व रंगाचा वापर होत असल्‍याने काही ठिकाणी कारवाई झाली आहे. या कारवाईचा धसका राज्‍यभरातील गूळ उत्‍पादक शेतकरी, व्‍यापारी यांनी घेतला आहे. पुणे जिल्‍ह्यातील काही गुर्‍हाळ घरांवर धाडी टाकत भेसळयुक्‍त गूळ मिळाल्‍याने ती गुर्‍हाळघरे सील करत संबंधित गुर्‍हाळ मालकांवर कारवाई केली आहे. त्‍यामुळे सध्‍या पुणे, सांगली, निरा येथील बाजार समितींमध्‍ये गेल्‍या चार ते पाच दिवसांपासून गुळाचे साैदे बंद राहिले आहेत. या कारवाईचा धसका आता कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांनीही घेतला आहे.

गुळाचे उत्‍पादन कमी होत असल्‍याने समितीमध्‍ये सध्‍या दिवसाआड गुळ सौदे सुरू आहेत. सोमवारी निघालेल्‍या सौद्यात समितीमध्‍ये ३० किलो वजनाच्‍या ३,३८६ गुळ रव्‍यांची आवक झाली. सौद्यादरम्‍यान गूळ उत्‍पादक शेतकर्‍यांनी सोमवारपासून गूळ उत्‍पादन बंद करणार असल्‍याचे सांगितले. दिवसाआड सौदे निघत असल्‍याने आज बुधवारी सौदे निघणार आहेत. मात्र, शेतकर्‍यांनी उत्‍पादन बंद करणार असल्‍याचे सांगितल्‍याने आज सैदे निघणार का नाही याकडे लक्ष असणार आहे.

लोकप्रतिनिधींची घेतली भेट

जिल्‍ह्यातील काही गूळ उत्‍पादकांनी जिल्‍ह्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी लोकप्रतिनिधी यांनीही संबंधित आधिकारी कडक शिस्‍तीचे आहेत, त्‍यामुळे नियमानुसारच गुळाचे उत्‍पादन करा, असे संबंधित गूळ उत्‍पादकांना सांगितले. त्‍यानुसार सध्‍या कर्नाटकमध्‍ये ऊस शिल्‍लक आहे. तेथून ऊस उपलब्‍ध झाला, तरच गूळ उत्‍पादन करण्‍याचा निर्णय उत्‍पादकांनी घेतला असल्‍याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT