Jaggery Price Hike | गुळाचा गोडवा महागला; किलोचा दर ८० रुपयांवर 
कोल्हापूर

Jaggery Price Hike | गुळाचा गोडवा महागला; किलोचा दर ८० रुपयांवर

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली; क्विंटलमागे १,२०० ते १,३०० रुपयांची वाढ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : साखरेच्या दरवाढीनंतर आता गुळाच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. २१) गुळाच्या दराने क्विंटलमागे ६,३०० ते ७,८०० रुपयांचा टप्पा गाठला. त्यामुळे किरकोळ बाजारात गुळाचा दर किलोमागे ८० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत गुळाच्या दरात क्विंटलमागे सरासरी १,२०० ते १,३०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात किरकोळ गूळ विक्री ७८ ते ८० रुपये असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

बाजार समितीमध्ये एका किलोच्या गूळ रव्याला प्रतिक्विंटल ७,८०० रुपयांपर्यंत बोली मिळाली. महिनाभरापूर्वी गुळाचे दर ४,५०० ते ४,६०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास होते. आता हे दर थेट ६,३०० ते ७,८०० रुपयांवर पोहोचले आहेत. राज्यभरातून सणांच्या पार्श्वभूमीवर गुळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांनी कोल्हापूरच्या बाजारपेठेकडे लक्ष केंद्रित केले आहे. बाजार समितीत गुळाचा शिल्लक साठा कमी असल्याने दररोज नवीन आवकेची प्रतीक्षा करावी लागत आहे. आवक झाल्यानंतर एक दिवसआड गुळाचे सौदे काढले जात आहेत.

दरम्यान, साखरमिश्रित गुळाची आवक होत असल्याने अन्‍न व औषध प्रशासनाने गूळ बाजारावर लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी, कर्नाटकातून होणारी गुळाची आवकही मंदावली आहे. सणासुदीच्या तोंडावर साखरेपाठोपाठ आता गुळानेही किलोमागे ८० रुपयांचा टप्पा पार केल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडू लागला आहे.

साखर दर ७८ रुपयांवर स्थिर सोशल मीडियावर भन्‍नाट मीम्स; सणासुदीच्या तोंडावर दरवाढीची चर्चा

कोल्हापूर : सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दराने गाठलेली ८० रुपयांची पातळी शनिवारीही कायम राहिली. घाऊक बाजारात दरवाढीचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत असून, साखरेचा दर ७८ रुपये किलोवर स्थिर असल्याची माहिती घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांनी दिली. साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर घराघरांत विविध पदार्थ, मिठाई आणि फराळासाठी साखरेची मागणी वाढणार असल्याने दर आणखी वाढतील का, याबाबतही ग्राहकांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, साखरेचे दर वाढल्याची चर्चा सोशल मीडियावरही चांगलीच रंगली आहे. साखरेच्या वाढत्या दरावर आधारित विविध भन्‍नाट रील्स, हटके मेसेज आणि मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सणासुदीच्या काळात साखरेचा वाढता दर हा सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT