Kolhapur Market | बाजार समितीत गुळाला उच्‍चांकी ५,५०० रुपये दर  
कोल्हापूर

Kolhapur Market | बाजार समितीत गुळाला उच्‍चांकी ५,५०० रुपये दर

गुजरात कोल्‍डस्‍टोरेजमधील साठवणूक कमी झाल्‍याचा परिणाम; ७,४५० रव्‍यांची आवक

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर शेती उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये एक नंबर प्रतीच्‍या गुळाला उच्‍चांकी ५,५०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. गुजरातमधील कोल्‍डस्‍टोरेजमध्‍ये गुळाची साठवणूक कमी झाल्‍याने सध्‍या मागणी वाढली आहे; तर जिल्‍ह्यातील उत्‍पादनही कमी झाल्‍याने गुळाचे दर वाढले आहेत. गुळाच्‍या मूळ हंगामातही जितका दर मिळाला नाही, त्‍याहून अधिक दर सद्यस्‍थितीत गुळाला मिळत आहे.

जिल्‍ह्यात ऑक्‍टोबर ते मार्च दरम्‍यान गूळ उत्‍पादन होते. कोल्‍हापूर बाजार समितीमध्‍ये येणारा बहुतांश गूळ गुजरातला पाठवतात. कोल्‍हापूरसह सांगली, कर्नाटकमधून येणार गूळ गुजरातमधील अहमदाबाद, म्‍हैसाना, हिम्‍मतनगर येथील कोल्‍डस्‍टोरेजमध्‍ये साठवला जातो. मार्च महिन्‍यानंतर स्‍टोरेजमधील गूळ बाहेर काढला जातो. मात्र, यंदा येथे गुळाचे स्‍टोरेज कमी झाल्‍याचे सांगितले जाते.

बारमाही गूळ उपलब्‍धतेचा परिणाम

पूर्वी केवळ गूळ हंगामातच गुळाचे उत्‍पादन घेतले जायचे. त्‍यामुळे हंगामात उत्‍पादित झालेला गूळ गुजरातमधील कोल्‍डस्‍टोरेजमध्‍ये मोठ्याप्रमाणात साठवला जायचा. पण, हे चित्र गेल्‍या दहा वर्षांत बदलले आहे. आता बारमाही गूळ उत्‍पादन होत असल्‍याने गूळ स्‍टोरेजमध्‍ये ठेवण्‍याचे प्रमाण कमी होत आहे.

कारवाईची धास्‍ती, उत्‍पादन कमी

अन्‍न व औषध प्रशासन विभागाने मध्‍यंतरी पुणे जिल्‍ह्यातील गुर्‍हाळ घरांवर धाडी टाकत कारवाई केली. याचा धसका गूळ उत्‍पादकांनी घेतला. कारवाईच्‍या भीतीने गुर्‍हाळ घरे बंद ठेवली. परिणामी, गुळाचे उत्‍पादन कमी झाले अन् तुटवडा निर्माण झाला. गुळाची मागणी वाढली असून, आवक कमी झाल्‍याने दर वाढले असल्‍याचे व्‍यापार्‍यांमधून सांगण्‍यात येत आहे.

जिल्‍ह्यात गूळ, उत्‍पादन सुरू

अन्‍न, औषधच्‍या कारवाईमुळे कोल्‍हापूरमधीलही काही गूळउत्‍पादकांनी त्‍यांची गुर्‍हाळघरे बंद ठेवली. पण, उत्‍पादन पूर्णपणे थांबलेले नाही. ऊस हंगाम संपूनही गुर्‍हाळघरे सुरू आहेत. बुधवारी बाजार समितीमध्‍ये ३० किलोच्‍या ७,४५० गूळ रव्‍यांची आवक झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT