कोल्हापूर : कधी काळी कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पर्याय म्हणून पाहिले जाणार्या ‘आयटीआय’ची ओळख झपाट्याने बदलत आहे. थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, इंडस्ट्रीयल रोबोटिक्स यांसारखे नवीन अत्याधुनिक अभ्यासक्रम आयटीआयमध्ये शिकवले जाणार आहेत. त्यामुळे हमखास रोजगार, कौशल्य आणि स्वयंपूर्णतेचा नवा मार्ग विद्यार्थ्यांसाठी खुला होणार आहे.
सध्या शिक्षण घेऊनही शासकीय नोकरीची खात्री उरलेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय किंवा खासगी क्षेत्रातील संधी शोधत आहेत. अशा परिस्थितीत आयटीआय हे नवा पर्याय ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 12 शासकीय व 40 खासगी आयटीआयमध्ये 7 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आयटीआयमध्ये विशेषत: मुलींसाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा), ब्युटिशियन, फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी, ड्रेस मेकिंग यांसारखे अभ्यासक्रम चालविले जात आहेत. यामुळे मुलींच्याही संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नव्या अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही दिवसांपूर्वी याबाबतची घोषणा केली आहे. नवीन अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुदिद्धमत्ता (एआय), ईव्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रियल रोबोटिक्स आणि थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलार टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था नवीन अभ्यासक्रम ऑफर करतील, जे विकसनशील बाजारपेठेच्या मागणीनुसार असणार आहेत. कौशल्य विकास मंत्रालयाकडून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना 2 जून रोजी पत्र पाठविण्यात आले आहे. साधारणपण नवीन अभ्यासक्रमांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्यासंदर्भातील निर्देश दिले आहेत.
शासकीय आयटीआयमध्ये नवीन तीन कोर्सेस येत्या काही दिवसांत सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रीन चॅनेल व सीएसआर फंडातून नवीन कोर्सेस सुरू करण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. नवीन कोर्सेस सुरू झाल्यावर विद्यार्थी संख्या वाढेल. नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळेल.- महेश आवटे, प्राचार्य, शासकीय आयटीआय