कोल्हापूर : कोल्हापुरात ‘आयटी’ पार्क उभारण्यासंदर्भात जून महिन्यात या क्षेत्रातील तज्ज्ञांची बैठक घेऊन त्यांना येथील जागा दाखविण्यात येईल. त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील आरोग्यदूत मेळाव्यात ते बोलत होते.
सामंत म्हणाले, कोल्हापुरात ‘आयटी’ पार्कसाठी जागा निश्चित झाल्याचे आ. राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे. त्यामुळे आ. क्षीरसागर यांच्यासह या क्षेत्रातील तज्ज्ञांची कोल्हापुरात बैठक घेऊन ‘आयटी’ पार्क उभारण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. तसेच त्यांना ‘आयटी’ पार्कसाठीची जागा दाखवून सर्वकष चर्चेनंतर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. उद्योगांना स्वस्तात वीज उपलब्ध होण्यासाठी सोलर, कॅप्टिव्ह पॉवरबाबत महावितरणने धोरण आखले आहे. त्यानुसार उद्योगांना स्वस्त दरात वीज मिळेल. ऑगस्टमध्ये कोल्हापूर- दिल्ली विशेष रेल्वेद्वारे 1,200 कार्यकर्ते दिल्लीत जाऊन रक्तदान करण्याचा संकल्प आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जखमी झालेल्यांना रक्तदानाचा उपयोग होईल, असेही ते म्हणाले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांनी आरोग्यदूतांचे काम पुण्याचे असल्याचे सांगितले. माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनीही आरोग्यदूतांच्या कामांचे कौतुक केले. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे मंगेश चिवटे यांचे भाषण झाले. राम राऊत यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत साळुंखे यांच्या हस्ते मंत्री सामंत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास हंबीरराव मोहिते, संदीप मोहिते, प्रा. जालिंदर पाटील, गणेश चिवटे, प्रदीप चौगले, वैष्णवी चव्हाण आदींसह आरोग्यदूत उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून हजारो नव्हे, तर लाखो रुग्णांना मदत होऊन अनेकांचा जीव वाचला आहे. लोकांचे जीव वाचविण्याचे काम करणारे आरोग्यदूत नव्हे, तर देवदूतच आहेत. मंगेश चिवटे, तुमच्या मनातील इच्छापूर्तीसाठी एकनाथ शिंदे यांना साकडे घाला, असेही मंत्री सामंत म्हणाले.