Kolhapur IT Park File Photo
कोल्हापूर

Kolhapur IT Park | कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये आयटी पार्क

मंत्रिमंडळाची मंजुरी; भूमिपुत्रांना मिळणार रोजगार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शेंडा पार्कमधील 34 हेक्टर 36 गुंठे जमीन आयटी पार्क विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव आणला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये आयटी उद्योगाला चालना मिळून रोजगार उपलब्ध होणार आहे. महसूल विभागाच्या या प्रस्तावानुसार, शेंडा पार्क परिसरातील ही 34.36 हेक्टर जागा आयटी पार्क विकसित करण्यासाठी एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असलेला आयटी पार्क उभारण्याची योजना आहे. याद्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी, असा सरकारचा उद्देश आहे.

आयटी पार्कमध्ये मोठ्या कंपन्या येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रयत्न करू. कोल्हापूर व परिसरातील आयटी क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ देश व विदेशात कार्यरत आहे. या आयटी पार्कमुळे या क्षेत्रातील भूमिपुत्रांना कोल्हापूरमध्येच रोजगार उपलब्ध होईल. दळणवळणासह आयटी पार्कसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयीसुविधा आता कोल्हापुरातच निर्माण झाल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

शेंडा पार्कातील ही जागा मुंबई- बंगळूर राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असून, आजूबाजूला मोठी नागरी वस्ती आणि शैक्षणिक संस्था विकसित होत आहेत. जवळच शिवाजी विद्यापीठ आणि अन्य नामांकित संस्थाही असल्यामुळे कुशल मनुष्यबळही सहज उपलब्ध होणार आहे. या जागेलगतच 25 एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 25 एकर जागेवर उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ प्रस्तावित असून, नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हसन मुश्रीफ व अमल महाडिक यांनी यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दै. ‘पुढारी’च्या मागणीला यश

कोल्हापुरात आयटी पार्क व्हावा, यासाठी दै. ‘पुढारी’ने सातत्याने मागणी लावून धरली होती. त्यासंदर्भातील वृत्त, वृत्तमालिका आणि मान्यवरांच्या कोल्हापूर भेटीवेळी ‘पुढारी’ने ही मागणी सातत्याने केली होती. कोल्हापुरातील हजारो युवक देश आणि परदेशात आयटी क्षेत्रात कार्यरत असून, त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी ‘पुढारी’ने सातत्याने आग्रही भूमिका घेतली. आता शेंडा पार्क येथील जागेत आयटी पार्क करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT