kolhapur | पन्हाळगडाच्या पायथ्याशी प्रेमीयुगुलांचे ‘चाळे’ 
कोल्हापूर

kolhapur | पन्हाळगडाच्या पायथ्याशी प्रेमीयुगुलांचे ‘चाळे’

रिसॉर्टस् आणि फार्म हाऊसमध्ये अनैतिक धंद्यांना ऊत

पुढारी वृत्तसेवा

इंद्रजित शिंदे

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याशी अनैतिकतेचा बाजार मांडला जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. गडावर अशा घटना घडत नसल्या तरी, गडाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा आणि पायथ्याशी प्रेमीयुगुलांचे चाळे पाहायला मिळत आहेत.

गेल्या काही वर्षांत लॉजिंग, रिसॉर्टस् आणि फार्म हाऊसचे मोठे जाळे पसरले आहे. यातील अनेक ठिकाणी नियमांची उघडपणे पायमल्ली करत ‘हाय प्रोफाईल’ वेश्या व्यवसायासारखे अनैतिक प्रकार सुरू आहेत. या अनैतिक व्यवसायांसाठी जाणीवपूर्वक वर्दळ नसलेली आणि लोकांचा वावर कमी असलेली ठिकाणे हेरली जात आहेत. माळरानावर किंवा डोंगराच्या आडोशाला असणार्‍या या लॉजेसमध्ये ग्राहकाची ओळख उघड होऊ नये याची कमालीची काळजी घेतली जाते. ग्राहकांच्या गाड्या आणि व्यक्तींची ओळख लपवण्यासाठी अनेक ठिकाणी प्रवेशद्वारावर शेडचा आडोसा करण्यात आला आहे, जेणेकरून बाहेरून कोणालाही आत कोण शिरले हे दिसू शकणार नाही. अनेक तरुण-तरुणी आपले चेहरे रुमालाने पूर्णपणे बांधून थेट या शेडच्या आडोशाने आत प्रवेश करतात.

धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी एखादे जोडपे आल्यास केवळ पुरुषाचे ओळखपत्र घेतले जाते आणि स्त्रियांचे ओळखपत्र घेण्याचे जाणीवपूर्वक टाळले जाते. यामध्ये संबंधित मुलगी अल्पवयीन असण्याची मोठी शक्यता असून, अशा बेजबाबदार पद्धतीमुळे गंभीर गुन्ह्यांना वाव मिळत आहे. केवळ 300 ते 400 रुपयांत तासिका तत्त्वावर खोल्या उपलब्ध करून दिल्या जात असून, मोठ्या फार्म हाऊसमध्ये संपूर्ण बंगला देण्याऐवजी सिंगल रूम भाड्याने देऊन तिथे छुप्या पद्धतीने ‘हाय प्रोफाईल’ वेश्या व्यवसाय चालवला जातो. शनिवार आणि रविवारी या ठिकाणी पार्ट्यांच्या नावाखाली मद्यधुंद धिंगाणा घातला जातो. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असूनही ते केवळ नावापुरतेच आहेत.

प्रशासनाने कठोर कारवाई करावी

तोंड बांधून येणार्‍या या संशयास्पद ग्राहकांमुळे आणि विना नोंदणी चालणार्‍या व्यवसायांमुळे भविष्यात मोठी गुन्हेगारी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पन्हाळ्याची ऐतिहासिक ओळख टिकवण्यासाठी या अवैध कृत्यांवर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT