सुनील कांबळे
नागाव : रशिया-युक्रेन युद्धानंतर आता अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा थेट फटका कोल्हापूरच्या फाऊंड्री आणि इंजिनिअरिंग क्षेत्राला बसण्याची शक्यता असून, कच्च्या मालाच्या आयातीसह इंधनाचे दर गगनाला भिडल्याने उद्योजक धास्तावले आहेत. परिणामी, कोल्हापूरच्या फाऊंड्री उद्योगावर मंदीचे सावट असल्याचे मत काही तज्ज्ञांचे आहे. त्यामुळे ‘स्मॅक’ आणि ‘गोशिमा’ यांसारख्या संघटनांनी या जागतिक घडामोडींकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग होर्मूझची सामुद्रधुनी विस्कळीत होण्याचा धोका आहे. इराणवर निर्बंध लागल्यास किंवा युद्ध सुरू झाल्यास कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 ते 120 च्या पार जाऊ शकतात. यामुळे कोल्हापुरातील कारखान्यांना लागणारे फर्नेस ऑईल आणि ट्रान्स्पोर्टेशनचा खर्च प्रचंड वाढेल. इराणमार्गे येणारा विशेष धातूंचा पुरवठा थांबल्यास कास्टिंगच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारला असून भारतीय रुपया कमकुवत होत आहे.
कोल्हापूरच्या फाऊंड्री उद्योगाला लागणारे उच्च दर्जाचे पिग आयर्न आयात करताना आता पूर्वीपेक्षा 10 ते 15 टक्के अधिक रक्कम मोजावी लागत आहे. आधीच लाल समुद्रातील संकटामुळे मालवाहतूक महागली होती. त्यात आता पर्शियन गल्फमधील तणावाची भर पडल्याने विमा हप्ते 400 पटीने वाढले आहेत. एमआयडीसी शिरोली येथील सुमारे 3,500 ते 4,000 कोटींची वार्षिक उलाढाल या आखाती युद्धामुळे धोक्यात आली आहे. हे संकट लवकर निवळले नाही, तर येथील उद्योगाचे अर्थचक्र धोक्यात येईल. परिणामी, कामगारांच्या रोजगारावर आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांवर याचे मोठे सावट राहील.